Breaking News

फलटणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रज्ञानाचा महाकुंभ ; इनोव्हेशन २के२६ आणि हॅकाथॉन २के२६ स्पर्धांसाठी देशभरातून ५४४ संघांचा सहभाग

Technology mega event at Phaltan's Engineering College; 544 teams from across the country participate in Innovation 2K26 and Hackathon 2K26 competitions

       फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : नवकल्पनांना प्रोत्साहन, तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची संधी उपलब्ध करुन देणारा राष्ट्रीय पातळीवरील भव्य तांत्रिक महोत्सव दि. ३ व ४ नोव्हेंबर रोजी फलटणमध्ये रंगणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित  अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्यावतीने (स्वायत्त संस्था) इनोव्हेशन २के२६ आणि हॅकाथॉन २के२६ या दोन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन त्यानिमित्ताने करण्यात येत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

    अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी सोसायटी अमृत महोत्सव निमित्ताने सोसायटी स्थापनेनंतरच्या गेल्या ७५ वर्षात सोसायटीने केलेली प्रगती आणि गुणवत्तेसह परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यात मिळविलेले यश यासंबंधी सविस्तर माहिती दिली. 

    देशातील ५ पेक्षा अधिक राज्यांतून तब्बल ५४४ संघ आणि सुमारे २ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याने या तांत्रिक महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याचे स्पष्ट झाले आहे.

    सातारा जिल्ह्यातील NAAC ‘A’ ग्रेड आणि NBA मान्यता प्राप्त पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या या संस्थेने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना, संशोधनवृत्तीला आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणाऱ्या या स्पर्धांमुळे फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांची नवी पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

    ५ पेक्षा अधिक राज्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

    इनोव्हेशन २के२६ ही राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा, तर हॅकाथॉन २के२६ ही राष्ट्रीय स्तरावरील संगणक संकेतलेखन आणि समस्या निराकरण स्पर्धा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिसा, गुजरात यांसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. इनोव्हेशन २के२६ साठी ३९९ संघ, तर हॅकाथॉन २के२६ साठी १४५ संघ असे एकूण ५४४  संघाची नोंदणी झाली असून या तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी किंबहुना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या संघातील विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

    या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिक संकल्पना सादर करण्याची, नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची, संगणकीय कौशल्ये सिद्ध करण्याची आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची संधी मिळणार असल्याने हा महोत्सव केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, कल्पकतेला आणि भविष्यातील तंत्रज्ञानविषयक वाटचालीला दिशा देणारा उपक्रम ठरणार आहे.

    इनोव्हेशन २के२६ मध्ये लाखोंची पारितोषिके

    राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत अभियांत्रिकी विभागातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे १ लाख २१ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ६१ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. पॉलिटेक्निक विभागात प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय विविध श्रेणींमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांची १० अतिरिक्त पारितोषिके देण्यात येणार आहेत. दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

    हॅकाथॉन २के२६ मध्येही बक्षिसांची मोठी संधी

    विद्यार्थ्यांच्या संगणकीय कौशल्यांची, तर्कशक्तीची आणि समस्यांवर तत्काळ उपाय शोधण्याच्या क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या हॅकाथॉन २के२६  स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये,  द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विविध श्रेणींमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांची ६ अतिरिक्त पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

    मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन व पारितोषिक वितरण

    या तांत्रिक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, स्पर्धांना सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. समारोप व पारितोषिक वितरण समारंभ दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

    संस्थेच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध तयारी

    फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. मनोजकुमार व्ही. दळवी हे या उपक्रमाचे संयोजक आहेत.

    इनोव्हेशन २के२६ साठी प्रा. गोविंद ठोंबरे, प्रा. नितीन भुजबळ, प्रा. इंदिरा ठाकूर आणि प्रा. स्वप्नाली पिसाळ आणि हॅकाथॉन २के२६ साठी प्रा. किरण समगीर आणि प्रा. रुजल दोशी हे संयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

    प्राध्यापक वर्ग आणि महाविद्यालयातील संबंधीत यंत्रणेच्या समन्वयातून या राष्ट्रीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. महाविद्यालयाच्या श्रीमंत शिवाजीराजेनगर, कुरवली रोड, ठाकूरकी, फलटण, जि. सातारा येथील परिसरात या दोन्ही स्पर्धा पार पडणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.coephaltan.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला राष्ट्रीय व्यासपीठ, नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि गुणवत्तेला भरघोस पारितोषिकांची जोड देणारा इनोव्हेशन २के२६ आणि हॅकाथॉन २के२६ हा महोत्सव फलटणच्या शैक्षणिक वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

    पत्रकार परिषदेपूर्वी या महोत्सवाला सहाय्य करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करुन त्यांना धन्यवाद देण्यात आले. प्रारंभी प्रा. शांताराम काळेल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

No comments