फलटण फेस्टिव्हल मध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर; लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण फेस्टिव्हल 2026 च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला भव्य लावणी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी आणि पारंपरिक लावणी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात दापोली येथील नामवंत लावणी कलाकारांनी आपल्या बहारदार नृत्याविष्काराने, दमदार अदाकारीने आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
या लावणी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामालाताई नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तसेच मनीषाताई नाईक निंबाळकर, शिवजल ग्रुपचे सचिन भोसले, वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड. सौ. मधुबाला भोसले, सौ.मृणालिनी भोसले, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका रूपाली सस्ते, सुपर्णा अहिवळे, मीनाताई काकडे, मोहिनी हेंद्रे, अस्मिता लोंढे, सुलक्षणा सरगर,सिद्धाली शहा, कमल सखी आदी उपस्थित होते.
ढोलकीचा ठेका, घुंगरांचा नाद आणि लावणीच्या तालावर उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक रंगमंच आणि कलाकारांच्या कलाविष्कारामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवातून लोककलेचे महत्त्व अधोरेखित झाले. लावणी ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अनमोल ठेवा आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, कलाप्रेमी आणि लावणी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आयोजकांच्या नियोजनामुळे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

No comments