फलटण फेस्टिव्हल २०२६ चे २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ : फलटणकरांसह परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, खाद्यपदार्थ,लावणी नृत्य, बहारदार हिंदी मराठी गाणी, आणि विविध वस्तूंच्या खरेदीची अनोखी संधी घेऊन ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. २४ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर श्री. सद्गुरू हरिबाबा नगरीत , एस.टी. स्टँडसमोर, फलटण येथे होणार असून, फलटण फेस्टिव्हल शुभारंभ प्रसंगी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, पंचायत समिती फलटणच्या सभापती शिवांजलीताई भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीची मानद सचिव सचिन भैय्या बेडके हे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती फलटण फेस्टिवलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली.
मध्यंतरी काही अपरिहार्य कारणांनी दहा वर्षे बंद झालेला आणि आता होत असलेल्या या महोत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी, गृहपयोगी साहित्य, कपडे, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाचे खेळ तसेच ऑटोमोबाईल्सचे प्रदर्शन आणि विक्री अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. नागरिकांना एकाच ठिकाणी मनसोक्त खरेदी आणि मनोरंजनाचा सहकुटुंब दिवाळी सणाच्या आधीच आनंद घेता यावा, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
महोत्सवात महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, घरगुती चविष्ट पदार्थ, लोकप्रिय स्नॅक्स आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी खास मनोरंजनाची साधने, खेळ आणि डॉ.विजय साबळे यांचे गाणी मनातील हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम,भव्य डान्स स्पर्धा, रमेश परळीकर यांचे होम मिनिस्टर पैठणी शो, दापोली येथील प्रसिद्ध लावणी नृत्यांगनांचा लावणी महोत्सव आदी विविध आकर्षक मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत कुटुंबासह वेळ आनंदात घालविण्यासाठी हा फेस्टिव्हल विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून व्यापारी, व्यावसायिक आणि लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते रात्री १० अशी असून, नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन फलटण फेस्टिवल चे उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ,कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.
.jpg)
No comments