विडणीतील ३३/२२ के.व्ही. उपकेंद्र स्थगित; ग्रामस्थ आक्रमक, सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ : फलटण तालुक्यातील विडणी येथे प्रस्तावित असलेल्या ३३/२२ के.व्ही. वीज उपकेंद्राचा विचार महावितरण कंपनीने स्थगित केला आहे. यामुळे विडणी ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, महावितरणच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येत्या सोमवारी सकाळी ९ वाजता महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विडणी ग्रामपंचायतीचे सरपंच सागर अभंग यांनी दिली.
एडीबी (ADB) योजनेअंतर्गत विडणी येथे ३३/२२ के.व्ही. वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले होते. या उपकेंद्रासाठी सुमारे एक एकर जागेची आवश्यकता होती. मात्र, सरकारी अथवा गायरान जमीन उपलब्ध नसल्याने खासगी जागा मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार विडणी येथील श्रीमती मनिषा व्यंकट दडस यांनी त्यांच्या मालकीच्या क्षेत्रापैकी एक एकर जागा उपकेंद्रासाठी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी आणि अन्य अडचणींचा विचार करून महावितरणने उपकेंद्राचा विचार स्थगित केला आहे. संबंधित जागेवर फलटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बोजा असल्याची नोंद आहे. तसेच, पुनर्वसन कायद्यान्वये जागेच्या हस्तांतरणावर निर्बंध असल्याने प्रांताधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचे महावितरणने नमूद केले आहे. याशिवाय, उपकेंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची उपलब्धता आणि जागामालकाने मागणी केलेला दर व महावितरणने निश्चित केलेला सरासरी दर यांतील तफावत या बाबीही अडचणीच्या ठरल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या कारणांमुळे विडणी येथील प्रस्तावित ३३/२२ के.व्ही. उपकेंद्राचा विचार स्थगित करण्यात आल्याचे महावितरणच्या फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सरपंचांना पत्राद्वारे कळविले आहे.
दरम्यान, संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी न करताच विविध अडचणींचा आधार घेत उपकेंद्राचा विचार स्थगित करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे महावितरणच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विडणी परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्तावित उपकेंद्र महत्त्वाचे असल्याची ग्रामस्थांची भूमिका आहे. त्यामुळे उपकेंद्राबाबत घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ९ वाजता महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनातून ग्रामस्थ आपली भूमिका मांडणार असल्याचे सरपंच सागर अभंग यांनी सांगितले.

No comments