Breaking News

आशियाई क्रीडा स्पर्धेत झळकलेल्या ऋतुजा पिसाळचा फलटण येथे भव्य रॅली व नागरी सत्कार

Rituja Pisal, who excelled in the Asian Games, receives a grand rally and civic felicitation in Phaltan

ऋतुजा पिसाळ यांच्या यशाने फलटणचा नावलौकिक वाढला; श्रीमंत संजीवराजे यांच्याकडून कौतुकाची थाप

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ : जपानमधील निगोया येथे झालेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये हॉकी खेळात सुवर्णपदक मिळवून फलटणचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सुवर्णकन्या कु. ऋतुजा दादासो पिसाळ यांचा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आज भव्य रॅली काढून व नागरी सत्कार आयोजित करून सन्मान करण्यात आला.

    सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रॅलीमध्ये सुमारे ५०० ते ६०० खेळाडू व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेळाडू व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,  प्रशासकीय अधिकारी निकम सर, प्राचार्य शेडगे सर, सुरज जाधव, अहिवळे सर, दादासाहेब चोरमले सर, लाळगे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

    श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार करून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

    यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ऋतुजा पिसाळ यांच्या यशाचे कौतुक केले. ते म्हणाले की, हॉकी खेळात फलटणने आपली आगळीवेगळी परंपरा कायम राखली आहे. त्यामुळेच आज भारतीय हॉकी संघात फलटणचे चार खेळाडू खेळत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

    कुमारी ऋतुजा पिसाळ यांनी आशियाई स्पर्धेत अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी अनेक गोल नोंदवले. भारतीय संघाने अंतिम सामन्यात चीनचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. या यशात ऋतुजा पिसाळ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

    ते पुढे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि सातत्य आवश्यक असते. आपण कोणताही खेळ खेळत असलो किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो, तरी मनापासून कष्ट घेतल्याशिवाय यशाचे फळ मिळत नाही.

    “ऋतुजा पिसाळ यांनी हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवून फलटणचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांचे हे यश संपूर्ण फलटणकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील मुलींमध्येही मोठी गुणवत्ता आहे, हे ऋतुजाने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. तिच्या यशातून इतर मुलींनाही प्रेरणा मिळेल. अशा खेळाडूंना प्रोत्साहन आणि योग्य संधी मिळाली, तर त्या निश्चितच देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात.”

    सत्काराला उत्तर देताना कु. ऋतुजा पिसाळ म्हणाल्या, फलटणमधील नागरिकांनी माझ्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभामुळे मला खूप अभिमान वाटत आहे. आपण ज्या क्षेत्रात आहे त्यामध्ये हार्ड वर्क करा, झोकून देऊन काम करा, यश नक्कीच मिळेल. खेळामध्ये उद्दिष्ट साधण्यासाठी हार्ड वर्क, कष्ट करा त्यामधून अनेक ऋतुजा तयार व्हाव्यात व फलटणचे नाव मोठे व्हावे. माझ्या यशामागे माझे आई-वडील, प्रशिक्षक आणि मला साथ देणाऱ्या सर्वांचे मोठे योगदान आहे.

    या भव्य रॅली व सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह निर्माण झाला. ऋतुजा पिसाळ यांच्या यशामुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कामगिरीतून नवोदित खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब चोरमले यांनी केले तर आभार प्रदर्शन मुधोजी हायस्कूलची प्राचार्य शेडगे सर यांनी केले.

No comments