Breaking News

वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Hit and run at Wathar Nimbalkar; 27-year-old woman dies during treatment

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ : फलटण-पुसेगाव मार्गावर वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील सुचिता अमर चव्हाण (वय २७, रा. वाठार निंबाळकर) यांचा पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेलेल्या अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दुचाकीवरील चौघांना धडक

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास अमर धोंडीराम चव्हाण हे पत्नी सुचिता आणि मुली आरोही व आराध्या यांना दुचाकीवरून घेऊन फलटण-पुसेगाव मार्गावरून जात होते. वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत सुनील कुंभार यांच्या वीटभट्टीजवळ पुसेगावच्या बाजूने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाच्या चालकाने चुकीच्या बाजूने, भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

    या अपघातात अमर चव्हाण, त्यांची पत्नी सुचिता आणि मुली आरोही व आराध्या हे चौघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सुचिता चव्हाण यांचा मृत्यू झाला.

    मदत न करता चालकाचे पलायन

    अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहनचालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी महेंद्र भगवान पुंडेकर (वय ३५, रा. वाठार निंबाळकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६, १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १३४(अ), १३४(ब) व १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत. अपघातातील अज्ञात चारचाकी वाहनाचा आणि चालकाचा शोध फलटण ग्रामीण पोलीस घेत आहेत.

    नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

    या अपघाताबाबत किंवा संबंधित अज्ञात चारचाकी वाहनाबाबत कोणाला काही माहिती असल्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments