Breaking News

फलटण संस्थानावर लिहिलेला अन्यायकारक व धादांत खोटा इतिहास खोडला पाहिजे - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

The unjust and blatantly false history written about the Phaltan State should be erased - Shrimant Raghunathraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास काही इतिहासकारांनी खोटा लिहिलेला असून तो सत्य पुराव्याअभावी लिहिलेला चुकीचा इतिहास इतिहास आहे, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी मुधोची महाविद्यालय फलटण येथे केले.

    इतिहास संशोधन मंडळ सातारा व मुधोजी महाविद्यालय फलटणच्या इतिहास विभागाने आयोजित केलेल्या, "विसाव्या शतकातील संस्थाने:फलटण संस्थांचा विषय संदर्भ",या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद व अधिवेशनाचे उद्घाटन करताना मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सातारा इतिहास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ.अरुण भोसले,प्रा चंद्रवर्धन नाईक, डॉ. विजयराव नलावडे, प्रा. डॉ. अवनीश पाटील, प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, प्रा.डॉ.संतोष कदम, डॉ. अनिल टिके होते, मा.श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर  बोलताना पुढे म्हणाले, दुसऱ्या बाजीरावाच्या काळात नीरा -शिवतक्रार या गावाच्या हद्दीवरून  पेशवे व फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यामध्ये वितुष्ट आले होते.त्याचा परिणाम पेशवे धर्जिण्या पुणेरी इतिहासकारांनी फलटण संस्थानाची चुकीची माहिती देऊन इतिहास लिहिताना बजाजी नाईक निंबाळकर यांच्या इस्लामीकरणाचे खोटे व चुकीचे व्रत इतिहासबद्ध केले की ज्याला काहीही आधार नाही,त्याचबरोबर फलटण संस्थानाबद्दल अनेक चुकीचे दाखले देऊन काही इतिहासकारांनी फलटण संस्थानावर अन्याय केला आहे.हा फलटणचा चुकीचा व  धादांत खोटा लिहिलेला इतिहास खोडून काढून फलटणच्या पुरोगामी व मानवतावादी जीवन कार्याचा इतिहास नव्या इतिहास संशोधकांनी मांडला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले. आपल्या उद्घाटन पर भाषणात ते म्हणाले, फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास पुरोगामी व लोकाभिमुख आहे.परंतु इतिहास लेखनाच्या अनेक ठिकाणी फलटण नाईक निंबाळकर घराण्याला चुकीच्या पद्धतीने इतिहासात मांडलेले आहे.मी याविरुद्ध अनेक गोष्टीत चॅलेंज करून नाईक निंबाळकरांच्या वरील खोटा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आहे.पुढील इतिहासकारांनी सत्यता व सारासार विवेक बुद्धीने तपासलेल्या पुराव्यांचा  आधार घेऊन फलटण नाईक निंबाळकर घराण्याच्या इतिहासाला न्याय द्यावा. ते म्हणाले फलटण संस्थांनाच नव्हे तर मराठी साम्राज्यातील अनेक महान कर्तृत्वान व्यक्तींच्या वरती काही इतिहासकारांनी चुकीची व खोटी माहिती घेऊन जो चुकीचा इतिहास लिहिलेला आहे तोही खोडून नवा खरा इतिहास लिहिणे गरजेचे असून यासाठी नव्या इतिहास संशोधन अभ्यासाकांची तयारी असली पाहिजे,असे ते म्हणाले.

    या राष्ट्रीय इतिहास परिषद व अधिवेशनात थोर विचारवंत, इतिहासकार व लेखक डॉ. आ.ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  ​पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले की, "‘No Document, No History’ हे खरे असले तरी, आपल्याला मिळालेला कागदपत्री पुरावा हा कोणी लिहिला आहे?का लिहिला आहे? तो कोणाचा हस्तक होता?त्याची विचारसरणी कोणती आहे? तो लोकाहितदक्ष होता की विध्वंसक होता?याची खात्री केली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतिहास नेमका खोटा लिहिला गेला आहे.आपण तो डोळसपणे तपासला पाहिजे. खोटेपणाला खोटेपणाने उत्तर न देता सत्य पुराव्यांच्या आधारे उत्तर दिले पाहिजे." मानसिक गुलामी मध्ये व आंधळ्या श्रद्धेत खरेपणा  नसतो, त्यासाठी खोट्या गोष्टींपुढे नतमस्तक न होता, खोट्याला खोटे व खऱ्याला खरे म्हणण्याचे सामर्थ्य पाहिजे.इतिहास लेखणात अनेक स्वार्थी प्रवृत्तीनी चुकीची, बदनामीकरक माहिती, धादांत खोटे पुरावे देऊन लेखन केलेले आहे ते पुसावे लागेल व सत्य इतिहास  लिहावा लागेल, ही जबाबदारी पुढच्या पिढीने घेतली पाहिजे.

    मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ झाला.इतिहास संशोधन, लेखन आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

    डॉ. आ. ह. साळुंखे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि लेखक म्हणून परिचित आहेत. प्राचीन भारतीय विचारपरंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, सामाजिक समता आणि चिकित्सक विचार यांसंबंधीच्या त्यांच्या लेखनाने मराठी वैचारिक विश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधनपर आणि प्रबोधनात्मक कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी करून राष्ट्रीय इतिहास परिषद व अधिवेशनाच्या आयोजनाचे प्रयोजन सांगितले.सातारा येथील प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे यांनी बीजभाषण केले.त्यामध्ये फलटणच्या राजघराण्याचा पुरोगामी वारसा, लोकविकासक दृष्टी, शिक्षण प्रसारचे कार्य, प्रोत्साहन, सहकार्य व आधुनिक बदलाचे कार्य अधोरेखित केले.

    या परिषदेतील ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ या विषयाच्या अनुषंगाने आयोजित परिषदेत इतिहास संशोधनाशी संबंधित शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. संस्थानकालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती, फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील संस्थानांचे स्थान यांसारख्या विषयांच्या अभ्यासाला या परिषदेमुळे चालना मिळाली.

    या अधिवेशनाच्या माध्यमातून इतिहास संशोधक, प्राध्यापक आणि अभ्यासकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.यावेळी १२८ शोध निबंधनाचे पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.इतिहास संशोधन आणि लेखन क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणारा डॉ. आ. ह. साळुंखे यांचा हा सन्मान परिषदेमधील महत्त्वपूर्ण ठरला.

    या इतिहास परिषद व अधिवेशनासाठी  संयोजक डॉ. ए. एस. टिके, समन्वयक प्रा. डॉ.एस. टी. कदम, डॉ. योगिता मठपती, प्रा. अभिजित कदम व विविध आयोजन समितीनी कष्ट घेतले.

No comments