फलटण फेस्टिव्हल २०२६ चा आज शुभारंभ ; पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्री सद्गुरू प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यानिमित्ताने दि. २४ ते २८ ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी फलटणकरांना अनुभवता येणार आहे.
यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नगरी’ येथे हा महोत्सव पार पडणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. श्री सद्गुरू प्रतिष्ठान व फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
उद्घाटन समारंभास फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, फलटण शुगर वर्क्सचे माजी चेअरमन प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले, फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या अध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २४ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा होईल. रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी ‘गाणी मनातली’ हा ऑर्केस्ट्रा आणि ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी ‘होम मिनिस्टर पैठणी शो’, मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी लावणी महोत्सव, तर बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरू होतील.
फलटणच्या सांस्कृतिक वैभवात मानाचे स्थान असलेल्या या महोत्सवातून नागरिकांना मनोरंजनासोबत विविध कलाविष्कारांचा आनंद घेता येणार आहे. फलटणकरांनी उद्घाटन समारंभासह पाचही दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ आणि कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.

No comments