Breaking News

रविवारी 'आपली फलटण मॅरेथॉन’ ; अभिनेता समीर धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

'Aapli Phaltan Marathon' on Sunday; Actor Sameer Dharmadhikari to be the chief guest

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ - धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळून नियमित व्यायामाची सवय लागावी आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’चे आयोजन २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन येथे करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये २१ किमी, १० किमी, ५ किमी, ३ किमी फन रन आणि ३ किमी वॉकॅथॉन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी आणि सिनेमॅटोग्राफर अपर्णा धर्माधिकारी तसेच झेडटीसीसीच्या प्रमुख पंकजा गोखले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.

    मॅरेथॉनची सुरुवात पहाटेपासून होणार आहे. २१ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी पहाटे ५.१० वाजता झुंबा वॉर्मअप होईल, तर ५.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी सकाळी ५.४० वाजता वॉर्मअप आणि ६ वाजता प्रारंभ होईल. ५ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी सकाळी ६.१० वाजता वॉर्मअप, तर ६.३० वाजता प्रारंभ होणार आहे.

    ३ किलोमीटर फन रनसाठी सकाळी ६.४० वाजता झुंबा वॉर्मअप आणि ७ वाजता प्रारंभ होईल. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी आयोजित ३ किलोमीटर वॉकॅथॉनसाठी सकाळी ७.१० वाजता वॉर्मअप, तर ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. पहाटेच्या अंधारामुळे आवश्यकतेनुसार वेळापत्रकात १५ मिनिटांपर्यंत बदल केला जाऊ शकतो, असे डॉ.प्राची जोशी यांनी कळविले आहे.

    मॅरेथॉननंतर सकाळी ८ ते ९.३० या वेळेत सहभागींसाठी नाश्ता आणि मनोरंजनात्मक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

    या समारंभासाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, सिनेमॅटोग्राफर अपर्णा धर्माधिकारी आणि झेडटीसीसीच्या प्रमुख पंकजा गोखले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

No comments