फलटण शहर व तालुक्यात लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत
![]() |
| नागरिकांनी परंपरेप्रमाणे आपल्या घरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली. (छाया - गंधवार्ता वृत्तसेवा) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात फलटण शहर व तालुक्यात लाडक्या गणरायाचे सोमवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी उत्साहात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींच्या मिरवणुका काढून श्रींची प्रतिष्ठापना केली. नागरिकांनीही परंपरेनुसार आपल्या घरांमध्ये गणेशमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवाला सुरुवात केली.
![]() |
| सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणेश मूर्तींचे आगमन झाले (छाया - गंधवार्ता वृत्तसेवा) |
गणेशमूर्तींच्या आगमनामुळे फलटण शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठेत दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. माळजाई परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. आकर्षक व विविध आकारांच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही चांगलीच रेलचेल पाहायला मिळाली. गणेश मंडप व घरांच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्य, आरास, नारळ, हार, फुले, दुर्वा, केवडा, कमळ तसेच पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.
घरातील लहान मुलांसह नागरिक दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनांतून गणरायाला घरी घेऊन जाताना दिसत होते. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये उत्सुकता आणि आनंद दिसून येत होता.
दरम्यान, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक सजावट व पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तींच्या देखण्या मिरवणुका काढल्या. ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी फलटण शहर व तालुक्यात उत्साह, भक्ती आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.


No comments