Breaking News

विडणीत सार्वजनिक गणेशोत्सवात विविध धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Various religious and cultural programs organized during the public Ganeshotsav in Vidin

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ : ग्रामपंचायत विडणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि. १४ ते २० सप्टेंबरदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणाऱ्या या गणेशोत्सवात भाविकांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली.

    गणेशोत्सवाची सुरुवात सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी श्रींच्या आगमनाने होणार आहे. त्यानंतर मंगळवारी झी टॉकीज फेम ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे नगरकर यांची कीर्तन सेवा, तर बुधवारी भारुडकर ह.भ.प. महादेव महाराज पळसदेवकर (सिंधखेडचा राजा) यांचे भारूड होणार आहे. गुरुवारी कुमार देवकाते प्रस्तुत ‘महा मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहे.

    शनिवारी विडणी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

    गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी ‘सौभाग्याचं लेणं लुटा’ हा विशेष उपक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महिलांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती होणार असून, त्यानंतर ‘रुद्रावतार’ ढोल-ताशा पथकाच्या गजरात श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.

    विडणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सर्व सदस्यांच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील गणेशभक्तांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.

No comments