आयडियल इंटरनॅशनल स्कूलचा दहीहंडी महोत्सव उत्साहात
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ - आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्यावतीने सजाई गार्डन येथील हिरवळीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त भव्य 'दहीहंडी महोत्सव २०२६' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मी नगर व बिरदेव नगर या दोन्ही शाखांमधील जुनियर केजी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे, इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या हस्ते बाळकृष्ण पूजन व आरतीने झाली. सूत्रसंचालन सुचिता जाधव यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी 'गोविंदा आला रे आला', 'गोविंदा रे गोपाळा', 'मच गया शोर सारी नगरी रे' या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. बालवर्गातील चिमुकल्यांनी बाळकृष्ण व राधाच्या वेशभूषेत लक्ष वेधले. सर्व नृत्यांचे दिग्दर्शन कोरिओग्राफर प्रशांत भोसले सर यांनी केले.
यानंतर शाळेच्या चार हाऊसच्या गोविंदा पथकांनी दहीहंडीस सलामी दिली. रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो हाऊसमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत ग्रीन हाऊसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात उंच मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले.
यावेळी क्रीडा शिक्षिका सौ. शुभदा सतीश झणझणे यांना कराड येथे मिळालेल्या 'मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२६' बद्दल डॉ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी झालेल्या शिक्षक दिन उपक्रमातील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ झाला. 'बेस्ट टीचर' म्हणून इयत्ता सहावीची संस्कृती गवळी हिला गौरवण्यात आले. तर शिपायाची जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल आरव खलाटे, अमरदीप कांबळे, स्वरूप तेली, हर्षवर्धन मुळीक (इ. ७ वी) आणि तन्मय देवकर (इ. ८ वी) यांचा सत्कार करण्यात आला.
हा महोत्सव केवळ सण साजरा करण्यासाठी नसून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विश्वास, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती रुजवण्यासाठी असल्याचे डॉ. वैशाली शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे मैदान व्यवस्थापन शुभदा झणझणे, प्रवीण पवार, निखिल सर व चैतन्य सर यांनी केले. शेवटी खाऊ वाटप व ओपन डान्सने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी डायरेक्टर शिवराज भोईटे सर, कमिटी मेंबर श्रद्धा शहा मॅडम यांच्यासह दोन्ही शाखांचे शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments