Breaking News

उपवर्गीकरण विरोधी संविधान समर्थन मोर्चाला वाढता पाठिंबा; विविध समाजांचा सहभाग

Growing support for the anti-sub-categorization Constitution Support Front; Participation of various communities

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ :  अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फलटण येथे आयोजित करण्यात येणाऱ्या संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चाला शहर व तालुक्यातील विविध समाजघटकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार, वाल्मिकी मेहतर-रुखी यांसह विविध समाजबांधवांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

    SC प्रवर्गातील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झाल्यास ५९ घटक जातींमध्ये आरक्षणाची विभागणी होऊन त्याचा सर्व समाजघटकांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका संविधान समर्थन मोर्चा समितीने मांडली आहे. विशेषतः शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या संधींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणात विभागणी होऊन भविष्यातील पिढ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी भूमिका मांडत समाजबांधवांनी वेळेत जागरूक होऊन या विषयावर जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असेही समितीच्या वतीने सांगण्यात आले.

    या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध समाजांच्या प्रमुखांची बैठक झाली.   यावेळी राहुल करे अखिल भारतीय होलार समाज संघटणा,तालुका अध्यक्ष फलटण, मनोज आयवळे अखिल भारतीय होलार समाज संघटणा, फलटण शहर,  जितेंद्र आप्पा सरगर, अध्यक्षहिंदु खाटीक समाज संघटणा , राजाभाऊ मारुडा अध्यक्ष, वाल्मिकी मेहतर रुखी समाज, गणेश कटके अध्यक्ष, हिंदु ढोर समाज संघटणा ,  किशोर पवार अध्यक्ष, बुरुड समाज संघटणा उपस्थित होते. यावेळी बौद्ध, चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार, वाल्मिकी मेहतर-रुखी आदी समाजांच्या प्रतिनिधींनी मोर्चात आपला समाज ताकदीने सहभागी करणार असल्याचे एकमताने जाहीर केले.

    संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चा गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मंगळवार पेठ येथील समाज मंदिरापासून सुरू होणार आहे. मोर्चाचा मार्ग बारामती चौक ते प्रांत कार्यालय, फलटण असा राहणार आहे.

    या मोर्चात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments