Breaking News

महाराणी सईबाई स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

The work of Maharani Saibai Memorial should be completed soon - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

स्मारकासाठी सुमारे १६ कोटींचा निधी मंजूर; सुधारित आराखडा ४६.३३ कोटींवर

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ : राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथे असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाच्या स्मारकाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

    विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांनी महाराणी सईबाई स्मारकासाठी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. स्मारकाचा मूळ विकास आराखडा २९.७३ कोटी रुपयांचा होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार एकूण आराखडा ४६ कोटी ३३ लाख ४५ हजार ८३ रुपये झाला आहे.

    फलटणच्या श्रीमंत नाईक-निंबाळकर घराण्याच्या राजकन्या , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची समाधी राजगडाच्या पायथ्याशी आहे. या ऐतिहासिक स्थळाशी महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत.

    महाराणी सईबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर गेले असता, त्यांनी या स्मारकाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत आपल्या भावना व्यक्त करत लोकभावनाही मांडल्या. “महाराणी सईबाई या स्वराज्याच्या पहिल्या महाराणी आहेत. त्यांच्या स्मृतीस्थळाचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून, आता प्रशासनाने कामाला गती द्यावी. पुढील वर्षी अभिवादनासाठी येताना भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिलेले दिसावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    यावेळी फलटण संस्थानचे युवराज,शिवसेना नेते तथा फलटण नगर परिषदेचे नगरसेवक ~ माननीय श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती.

    स्मारकाच्या विकासामध्ये समाधीचा जीर्णोद्धार, परिसराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंत, माहिती फलक तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा समावेश आहे.

No comments