SC आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चाची हाक ; ५८ समाजांच्या सहभागाचे आवाहन; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मागे घेण्याची मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ४ : अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाचे वर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, या प्रवृत्तींच्या निषेधार्थ फलटण येथे SC प्रवर्गातील ५८ समाजांच्या माध्यमातून संविधान समर्थन मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘चलो फलटण, चलो फलटण’ अशी हाक देत SC प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी आपल्या समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी संविधान समर्थन मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
SC प्रवर्गासाठी असलेले आरक्षण विविध समाजांना एकत्र बांधून ठेवणारे असून, आरक्षणाचे वर्गीकरण झाल्यास या प्रवर्गातील विविध समाजांची मोठी हानी होऊ शकते, अशी भूमिका मोर्चाच्या आवाहनातून मांडण्यात आली आहे.
संविधान समर्थन मोर्चाची तारीख आणि पुढील आंदोलनाची दिशा येत्या दोन-तीन दिवसांत SC प्रवर्गातील विविध समाजांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून निश्चित करण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी SC प्रवर्गातील ५८ समाजांमधील समाजसेवक, कार्यकर्ते व प्रतिनिधींनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments