Breaking News

रेकॉर्डवरील दोन आरोपी जेरबंद; फलटणमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचे ५ गुन्हे उघड

Two accused on record arrested; 5 transformer theft cases revealed in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांचा पोलिसांनी छडा लावत रेकॉर्डवरील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले असून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही काळापासून शेतातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. यावेळी राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण) आणि सनी रमन भोसले (रा. सरडे, ता. फलटण) या रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले.

    गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी केली असता, त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    तपासादरम्यान फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा रजि. नं. ४२१/२०२६, ४५५/२०२६, ४७८/२०२६, ४८१/२०२६ आणि ३९२/२०२६ असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधित गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    दरम्यान, मागील एका महिन्यात फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर व मोटार चोरीचे एकूण १९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून पोलिसांच्या या कारवाईचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments