शिक्षक दिनानिमित्त माजी प्राचार्य अर्जुनराव घोरपडे, संपतराव शिंदे यांचा सत्कार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत दैनिक ‘गंधवार्ता’चे संस्थापक संपादक शामराव अहिवळे यांनी माजी प्राचार्य अर्जुनराव घोरपडे तसेच ज्येष्ठ शिक्षक संपतराव शिंदे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन यथोचित सत्कार केला.
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याबरोबरच समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या ज्ञान, संस्कार व मार्गदर्शनातून अनेक पिढ्या घडविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सत्कार करण्यात आला.
यावेळी शामराव अहिवळे यांनी घोरपडे व शिंदे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी समाज घडविण्यासाठी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमातून शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.

No comments