Breaking News

फलटण ग्रामीण पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; महिला ताब्यात

Phaltan Rural Police take action against illegal liquor trafficking; Woman detained

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांकडून पेट्रोलिंग व विशेष कारवाई सुरू असतानाच निंभोरे ते फडतरवाडी रस्त्यावर अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका महिलेस ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून देशी दारूच्या ४८ बाटल्या व वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ९३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजता साखरवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी निंभोरे ते फडतरवाडी रोडवर एक महिला मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या जाताना आढळून आली. पोलिसांनी तिला थांबवून पंचांसमक्ष तिच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली.

    तपासणीदरम्यान मोटारसायकलवरील पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ४८ सीलबंद बाटल्या, किंमत ३ हजार ८४० रुपये, आढळून आल्या. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे ९० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ९३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    या प्रकरणी निंभोरे, ता. फलटण येथील ४८ वर्षीय महिलेस ताब्यात घेण्यात आले असून, अवैध दारू वाहतुकीप्रकरणी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिसे, पोलीस हवालदार पवार व पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांच्या पथकाने केली.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्धची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी सांगितले.

No comments