श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीला यश ; फलटण बसस्थानकाचे होणार आधुनिकीकरण ; २५ नवीन एसटी बसेस देणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ :राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटण एसटी आगाराला भेट देऊन आगाराच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फलटण बसस्थानकाचे अत्याधुनिक पद्धतीने आधुनिकीकरण करण्यात येणार असून आगारासाठी २५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर फलटण बसस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत आधुनिक प्रवासी सुविधा, प्रशस्त प्रतीक्षालय, व्यापारी गाळे, वाहनतळ, स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती प्रणालीसह अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज बसस्थानक उभारले जाईल. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाला नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल, तर प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सेवा मिळणार आहे. तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधीही निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि ग्रामीण भागातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन आगारासाठी एकूण २५ नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५, तर दुसऱ्या टप्प्यात १० बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. नवीन बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बसस्थानकातील स्वच्छता, प्रवासी सुविधा, बैठकीची व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
भेटीदरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, दत्ता बापू अनपट, दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विविध अडचणी जाणून घेण्यात आल्या. एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

No comments