सासकल येथे कृषी विभागाकडून ७५ शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप; राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाला गती
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ साठी सासकल येथे तृणधान्य पीक (बाजरी) प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत असून, कृषी विभागामार्फत ३ शेतकरी गटांच्या माध्यमातून ७५ शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपकृषी अधिकारी राजेंद्र पालवे, उपकृषी अधिकारी अजित सोनवलकर, सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ गुंजवटे तसेच सासकलचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषीसेवारत्न सचिन जाधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले की, एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता बाजरी हे कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेणे शक्य होणार आहे. फलटण तालुक्यात शेतकरी गटांच्या माध्यमातून बाजरी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तृणधान्यांच्या विकासाचा उद्देश देशाची अन्नसुरक्षा बळकट करणे, वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविणे आणि नागरिकांचे पोषणमूल्य वाढविणे हा आहे. बाजरी, ज्वारी, नाचणीसारखी भरडधान्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटकांनी समृद्ध असल्याने मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
तसेच तृणधान्ये कमी पाण्यात व कमी सुपीक जमिनीतही चांगले उत्पादन देत असल्याने हवामान बदलाच्या परिस्थितीत ती शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरतात. उत्पादन खर्च कमी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. याशिवाय जमिनीची सुपीकता टिकविणे, धूप रोखणे आणि देशातील अन्नधान्य उत्पादनात सातत्य राखणे हेही या अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी केले. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या प्रकल्पात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने यावेळी केले.

No comments