महावितरणच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण अटकेत, पाच गुन्ह्यांचा छडा
सातारा, दि. ५ (प्रतिनिधी) - पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियम तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून ११ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुरेश बबन जाधव (वय २३), दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (वय २६), आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने आणि बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने (वय ३३, सर्व रा. ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
पुसेगाव परिसरात वारंवार होत असलेल्या विद्युत तारा चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांनी संगनमताने पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच ठिकाणी विद्युत तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६, ४९/२०२६, ६१/२०२६, ७५/२०२६ आणि ११७/२०२६ या पाच गुन्ह्यांची उकल झाली.
आरोपींकडून चोरीस गेलेल्या १,२०८ किलो वजनाच्या अॅल्युमिनियम तारा (किंमत ५ लाख ४३ हजार ६०० रुपये) तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा मॅक्स पिकअप (एमएच-१६-एवाय-९६६५) किंमत ६ लाख रुपये असा एकूण ११ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments