Breaking News

फलटणच्या शनिवार वाड्यात गॅस सिलेंडरचा भडका

Gas cylinder explosion in Shaniwar Wada, Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ : शहरातील बुधवार पेठ परिसरातील शनिवार वाडा येथे शुक्रवारी (दि. १०) रात्री गॅस सिलेंडरचा अचानक भडका उडाल्याने आग लागून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र नगरसेवक विशाल तेली, विक्रम गॅस एजन्सीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार वाडा येथील रशीद शेख यांच्या मालकीच्या घरातील एका भाडेकरूच्या खोलीत गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विशाल तेली व विक्रम गॅस एजन्सीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत प्राथमिक स्तरावर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.
    दरम्यान, अग्निशामक दलालाही घटनेची माहिती देण्यात आली. पथक तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाले.
    या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, खोलीतील काही घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळेत करण्यात आलेल्या मदतकार्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने परिसरातील नागरिकांनी नगरसेवक विशाल तेली, विक्रम गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेचे कौतुक केले.

No comments