Breaking News

भक्तिरसात नाहली फलटणनगरी; 'आयडियल इंटरनॅशनल स्कूल'चा भव्य 'आयडियल वारी' पालखी सोहळा उत्साहात

Phaltan city filled with devotion; 'Ideal International School's' grand 'Ideal Wari' palanquin ceremony is full of enthusiasm

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ :येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या बिरदेव नगर व लक्ष्मी नगर शाखांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ११) आयोजित करण्यात आलेला 'आयडियल वारी' पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्स्फूर्त सहभागात पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

    सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पालखीतील पादुकांचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी निवड झालेल्या पालक जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, चोखामेळा आदी संतांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी हातात टाळ, भगवे ध्वज, तुळशी वृंदावन व ग्रंथ घेऊन पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले.

    ज्ञानेश्वर मंदिर ते महात्मा फुले चौक आणि पुढे डेक्कन चौक असा पालखी सोहळ्याचा मार्ग होता. वारीत ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, सजविलेली पालखी आणि शुभ्र घोडा हे विशेष आकर्षण ठरले. महात्मा फुले चौकात संस्थापक अध्यक्षा डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

    डेक्कन चौकात विद्यार्थ्यांनी बाल कीर्तन, भक्तिगीते, पारंपरिक नृत्य तसेच 'माणसात देव पहावा' या विषयावरील प्रबोधनपर नाटक सादर करून सामाजिक मूल्यांचा संदेश दिला. रिंगण सोहळा आणि त्यामध्ये महिला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

    यावेळी पालकांसाठी 'क्रिएटिव्ह रील्स स्पर्धा' आयोजित करून वारकरी परंपरा डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात आला.

    संपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक नियोजन प्रशांत भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंटर हेड सुचिता जाधव यांनी केले. प्रशांत भोसले व स्मिता पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

    या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणा संस्थापक अध्यक्षा व मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, सामाजिक मूल्ये, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारांची जपणूक व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या पालखी सोहळ्याचे फलटणकरांनी कौतुक केले.

No comments