फलटण तालुक्यात कृत्रिम दूधनिर्मितीचा पर्दाफाश; भेसळयुक्त दूधप्रकरणी गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १३ जुलै २०२६ : फलटण तालुक्यातील होळ येथे गाईच्या दुधात विविध पावडर मिसळून कृत्रिम व भेसळयुक्त दूध तयार करून डेअरीला पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली आप्पासाहेब खापणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे १२ जुलै रोजी मौजे होळ (ता. फलटण) येथे पंचांसमक्ष कारवाई करण्यात आली. यावेळी दिलीप भीमराव भोसले यांच्या गोठ्यालगतच्या खोलीत व्हे परमीएट पावडर स्प्रे ड्राइड व इन्स्टंट टी कॉफी क्रीमर (नॉन-डेअरी क्रीमर स्प्रे ड्राइड) या पावडरी तसेच त्या मिश्रित करण्यासाठी वापरण्यात येणारा मिक्सर आढळून आला. संबंधित पदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित साठा आणि मिक्सर जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत या पावडरी पाण्यात मिसळून गाईच्या दुधात टाकून कृत्रिम व भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचे समोर आले. हे दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीला पुरविले जात असल्याची माहितीही तपासात पुढे आली. तसेच या पावडरीचा पुरवठा नीरा येथील 'मोरे' नावाच्या व्यक्तीकडून होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात सौ. मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले, कुणाल दिलीप भोसले, संशयित पुरवठादार मोरे तसेच संबंधित डेअरीचे जबाबदार संचालक अथवा मालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५), ६१, १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६, २७ व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब असल्याने आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे तसेच संपूर्ण पुरवठा साखळीचा सखोल तपास सुरू असून, या गुन्ह्याचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत आहेत.

No comments