Breaking News

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक कारवाई ; २५ जणांना तडीपार, आणखी ७२ जणांच्या प्रस्तावावर प्रक्रिया

Police take drastic action against the backdrop of the palanquin ceremony; 25 people deported, proposals of 72 more processed

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ जुलै २०२६ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ९७ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यापैकी २५ जणांना तडीपार करण्याचे आदेश सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पारित केले आहेत.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून, त्यानंतर पालखी १६ ते १९ जुलैदरम्यान फलटण तालुक्यातून मार्गक्रमण करणार आहे.

    या कालावधीत लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ९७ व्यक्तींना तडीपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता.

    या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात २५ जणांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले असून, उर्वरित प्रस्तावांवरही नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

    पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून, वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी स्पष्ट केले.

No comments