फलटण तालुक्यात वारकऱ्याला मारहाण करून लुटले; ७० हजारांची रोकड लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ जुलै २०२६ : पंढरपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका वारकऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील ₹७० हजारांची रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे लुटल्याची घटना फलटण तालुक्यातील काशीदवाडी येथे घडली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबक अश्रुबा कोळेकर (वय ७२, रा. मोरवड, ता. वडवणी, जि. बीड) हे पंढरपूरहून पुण्याकडे परत जात होते. ६ जुलै रोजी पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास पुणे–पंढरपूर महामार्गालगत काशीदवाडी (ता. फलटण) येथे ते विश्रांतीसाठी थांबले होते.
यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून गोंधळ निर्माण केला. त्यानंतर फिर्यादी बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून त्यातील ₹७० हजारांची रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर फिर्यादी यांनी डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. मात्र जखमी अवस्थेमुळे त्यावेळी तक्रार दाखल करता आली नव्हती. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांनी तक्रार दिल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३११, ३२४(४) व ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत आहेत.

No comments