Breaking News

फलटण ग्रामीण हद्दीत ‘डीजे मुक्त मिरवणूक’ आणि ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to ‘DJ-free procession’ and ‘One village, one Ganpati’ initiative in Phaltan rural area

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ : शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ आणि ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

    पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरे शिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, तातवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंबोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी-सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुरणे, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर, टाकळवाडा आणि दालवडी या ३३ गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणूक काढण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

    तर शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, मांझेरी आणि उपळवे या १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

    या उपक्रमामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक एकोपा वाढण्यास, पारंपरिक संस्कृतीचे जतन होण्यास आणि गणेशोत्सवादरम्यान शांततामय वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

    सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततामय, सुरक्षित आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी केले आहे.

    “एक गाव – एक विचार – एक उत्सव; डीजे मुक्त गणेशोत्सवातून सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करूया!” असा संदेशही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

No comments