फलटणमध्ये भारतीय संविधान दिंडीचे जल्लोषात स्वागत; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
फलटण ( गंधवार्ता वृतसेवा) - दि.१८ - भारतीय संविधान दिंडीचे फलटण शहरात आगमन झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि पोलिस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी उपस्थित नागरिकांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलिस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे म्हणाले, "भारतीय संविधान हे समता, न्याय, बंधुता आणि ऐक्याची मूल्ये जपणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलालाही उच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली."
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस निरीक्षक बल्लाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरीश काकडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड, रिपाईचे ज्येष्ठ नेते विजय येवले, संजय निकाळजे, राजाभाऊ मारुडा, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सुपर्णाताई अहिवळे, मीनाक्षीताई काकडे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन करत संविधानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

No comments