Breaking News

क्रांतिसिंह नाना पाटील चौकात अपघात ; चारचाकी वाहन काँक्रीट रस्त्यालगतच्या खड्ड्यात

Accident at Krantisinh Nana Patil Chowk; Four-wheeler falls into a pit on the concrete road

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ जुलै २०२६ - फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने आज एसटी स्टँडमधून निघालेली एक चारचाकी गाडी रस्त्यावरील उंचीच्या फरकाचा अंदाज न आल्याने थेट बाजूच्या खड्ड्यात घसरल्याची घटना घडली.

    संबंधित ठिकाणी काँक्रीटचा रस्ता केवळ एका बाजूला तयार करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये सुमारे एक फूट उंचीचा फरक निर्माण झाला असून, कोणतेही संरक्षक बॅरिकेड, डिव्हायडर किंवा पुरेसे इशारा फलक नसल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन थेट खड्ड्यात उतरले.

    सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी अशा प्रकारची परिस्थिती गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून अर्धवट रस्ता, उंचीतील फरक, चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

    नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे रस्त्याची उंची तात्पुरती समतल करणे, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स व परावर्तित (रिफ्लेक्टर) इशारा फलक उभारणे तसेच अपूर्ण काम तातडीने पूर्ण करणे अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments