फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई; ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप्त
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ : फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध अमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत गुणवरे (ता. फलटण) येथील एका घराशेजारी करण्यात आलेली गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची, सुमारे ३४ हजार ६५० रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत २५ जून २०२६ रोजी गुणवरे गावातील घुलेवस्ती येथे एका घराच्या बाजूला गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ३४ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, संतोष मठपती तसेच शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, सागर अभंग, तुषार नलवडे, अमोल देशमुख आणि अविनाश शिंदे यांनी पार पाडली.

No comments