मुधोजी महाविद्यालय एन. सी.सी विभागाचा उपक्रम ग्रामीण भागातील खेळाडूंना नोकरीसाठी उपयुक्त- श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ : मुधोजी कनिष्ठ महाविद्यालय फलटण एनसीसी विभाग व क्रीडा विभाग आयोजित फलटण तालुकास्तरीय शारीरिक क्षमता चाचणी स्पर्धा- 2026 चे आयोजन दि. 14 जून 2021 रोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती करण्यात आले होते. सदर स्पर्धा 18 वर्षा आतील मुले व मुली यांच्यासाठी पोलीस, आर्मी, वनविभाग यासह विविध भरती साठी असणारे 1600 मीटर धावणे हा मुलांसाठी व 800 मीटर धावणे ही मुलींसाठी क्रीडाप्रकार ठेवण्यात आला होता. विविध भरती प्रक्रियेसाठी शारीरिक क्षमता चाचणी ही घेण्यात येते आणि या चाचणीचा सराव तरुण वयातच विद्यार्थ्यांना व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,सेक्रेटरी ,फलटण एज्युकेशन सोसायटी ,फलटण यांची संकल्पना होती. त्या अनुषंगाने सदर स्पर्धा घेण्यात आली व सदर स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास रेंजर सायकल व आकर्षक ट्रॉफी , द्वितीय व तृतीय क्रमांकास आकर्षक ट्रॉफी व चतुर्थ ,पाचवा आणि सहाव्या क्रमांकास मेडल असे दोन्ही वयोगटात एकूण 12 बक्षिसे देण्यात आले. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एजुकेशन सोसायटी, फलटण मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम, एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन प्रा. संतोष धुमाळ, सी. टी. ओ. प्रा. विकास तरटे, ज्येष्ठ प्रा.ए.डी. बनकर, मुधोजी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. स्वप्नील पाटील, संस्थेचे क्रीडा मार्गदर्शक श्री. राज जाधव, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील प्रमाणे पुरुष गट -प्रथम क्रमांक कु.दिगंबर शरद सूर्यवंशी, (सोनवडी), द्वितीय क्रमांक कु. विश्वजीत धुळावा सूळ, (आदर्की), तृतीय क्रमांक कु.वेदांत सुनील चव्हाण ,(झिरपवाडी) चतुर्थ क्रमांक कु.अमर कुंडलिक दडस, (दुधेबावी ),पाचवा क्रमांक कु.सतीश अंकुश यमगर, (झिरपवाडी) सहावा क्रमांक कु. आदित्य भानुदास पवार ,( बरड) महिला विजेते खेळाडू पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक कु. ईश्वरी हनुमंत पवार, (बरड), द्वितीय क्रमांक कु. संचिता मुकुंद गायकवाड, (फलटण) तृतीय क्रमांक कु. अमृता अंकुश ढेंबरे, (चौधरवाडी) चतुर्थ क्रमांक कु. अक्षदा विजय सस्ते ,(निरगुडी) पाचवा क्रमांक कु.ज्ञानेश्वरी बापू लंगुटे( बरड )सहावा क्रमांक कु. सोनाली जालिंदर खरात ,(सोनगाव) हे आहेत. सदर स्पर्धेमध्ये एकूण 165 खेळाडू यांनी सहभाग घेतला होता.
मुधोजी महाविद्यालय, फलटण मधील एन.सी.सी. विभागामधून दरवर्षी विविध भरतीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने भरती होऊन यश मिळवित आहेत. यावर्षी एकूण 32 विद्यार्थ्यांनी अग्निवीर आर्मीमध्ये व 09 विद्यार्थी यांची पोलीस भरती मध्ये निवड झाली आहे.सदर विभागाच्या माध्यमातून नेहमी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी घेतले जातात. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख श्री. प्रा. टी. एम. शेंडगे यांनी संयोजनास सहकार्य केले.

No comments