Breaking News

सासकलच्या बबन मुळीक यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर

Baban Mulik of Saskal awarded with prestigious 'Udyan Pandit' award by Maharashtra Government

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ :तालुक्यातील सासकल येथील प्रगतशील फलोत्पादक शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागातून त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

    बबन मुळीक यांनी जिद्द, परिश्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर माळरानावर समृद्ध फळबाग उभी केली आहे. त्यांनी डाळिंब, सीताफळ, अ‍ॅव्होकॅडो, वॉटर अ‍ॅपलसह विविध फळपिकांची लागवड केली असून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेत आहेत. शेतामध्ये गांडूळ खत युनिट उभारून खतनिर्मिती केली जाते. तसेच दशपर्णी अर्क, जीवामृत व व्हर्मीवॉश यांचा वापर करून फळपिकांचे संगोपन केले जाते.

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत सहभागी होत त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या अ‍ॅव्होकॅडो लागवडीचा मान मिळविला आहे. तसेच कृषी विभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फळपीक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून डाळिंब, सीताफळ, अ‍ॅव्होकॅडो व वॉटर अ‍ॅपलचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतात सुमारे २३ प्रकारची विविध फळपिके आणि अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे.

    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण फळबागेत १०० टक्के ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केले जाते. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून ते थेट फळांची विक्रीही करतात.

    या यशामागे पत्नी संगीता मुळीक, पुत्र अजिंक्य मुळीक व निखिल मुळीक यांची मोलाची साथ लाभल्याचे बबन मुळीक यांनी सांगितले. तसेच गावचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता आल्याचे त्यांनी नमूद केले.

    बबन मुळीक यांची ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे, उपकृषी अधिकारी अजित सोनवलकर तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments