राजकीय संघर्षात श्रीराम कारखान्याचा बळी देऊ नका ; कारखाना सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे : नंदकुमार मोरे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या राजकीय संघर्षात शेतकरी, कामगार आणि ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ देऊ नका. कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये आणि तो सक्षमपणे चालविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) फलटण तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मोरे यांनी, ज्यांच्याकडे कारखाना सक्षमपणे चालविण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे कारभार देणे केव्हाही योग्य असल्याचे म्हटले आहे. कारखान्याच्या कामकाजात भ्रष्टाचार झाला असल्यास त्याची चौकशी न्यायालय, मुख्यमंत्री किंवा संबंधित यंत्रणांमार्फत करावी; मात्र त्यासाठी कारखाना बंद पडू देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा आगामी हंगाम सुरळीत सुरू व्हावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. विशेषतः रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मोरे यांनी, फलटण तालुक्यातील चार साखर कारखान्यांपैकी श्रीराम हा एकमेव सहकारी तत्त्वावरील कारखाना असल्याचे नमूद करत, सहकाराची ही संस्था टिकविणे आवश्यक असल्याचे सांगितले. कारखाना बंद राहिल्यास शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार आणि संबंधित उद्योगांवर गंभीर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाविरोधात आरोप असतील तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी; मात्र राजकीय हस्तक्षेप करून कारखाना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी-कामगारांचा विश्वास संपादन करणारा असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तालुक्याच्या आर्थिक विकासासाठी कारखाना सुरू राहणे अत्यावश्यक असून राजकारणापेक्षा शेतकरी आणि कामगारांचे हित महत्त्वाचे आहे. संघर्षातूनच यश मिळते, त्यामुळे संयम ठेवून कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही नंदकुमार मोरे यांनी केले.

No comments