श्रीराम कारखाना चालवा, सहकार टिकवा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा; दोन्ही गटांनी राजकारण थांबवून कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिंता व्यक्त करत कारखाना कोणत्याही एका राजकीय गटाचा नसून हजारो शेतकरी सभासद, कामगार आणि ऊस उत्पादकांच्या घामातून उभा राहिलेला सहकारी कारखाना असल्याचे म्हटले आहे. कारखान्याचे राजकारण करून तो अडचणीत आणण्याचा कोणताही प्रयत्न शेतकरी सहन करणार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीराम कारखाना १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिल्यानंतरही कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज शिल्लक आहे. कारखाना चालविणे शक्य नसल्याचे सांगितले जात असताना या परिस्थितीस जबाबदार कोण, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे. कारखाना अडचणीत आणणे, तोटा दाखविणे आणि नंतर खाजगी क्षेत्राकडे वळविण्याचा प्रयत्न सहकार क्षेत्रासाठी घातक असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कारखाना बंद पडल्यास सर्वाधिक फटका शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. हजारो टन ऊस इतर कारखान्यांकडे वळेल, रोजगार धोक्यात येतील आणि सहकार चळवळीला मोठा धक्का बसेल. त्यामुळे कारखाना बंद ठेवण्याचा किंवा दुर्लक्षित करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण थांबवून कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. सहकार टिकवायचा असेल तर कारखाना चाललाच पाहिजे, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.
सत्ताधाऱ्यांनी सहकारी संस्था कमकुवत करण्याऐवजी त्यांना बळकट करण्यासाठी सत्तेचा वापर करावा. श्रीराम कारखान्याच्या बाबतीत शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले गेले पाहिजे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी हिताला बाधा पोहोचविणारा किंवा श्रीराम कारखान्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा कोणताही निर्णय झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत "कारखाना चालवा, शेतकरी वाचवा, कामगार वाचवा आणि सहकार टिकवा" हीच संघटनेची ठाम भूमिका असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले.
या निवेदनावर सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, साखरवाडी विभागप्रमुख किरण भोसले, किसनराव शिंदे, बाळासाहेब शिपुकले आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
%20copy.jpg)
No comments