पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवू नका; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरणला इशारा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ जून २०२६ : साखरवाडी परिसरातील होळ गाव व आजूबाजूच्या भागात वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना, लेखी माहिती किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणकडे तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण साखरवाडी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात, वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत पुरेशी माहिती न देता तसेच त्यांच्या शंकांचे निरसन न करता मीटर बसविण्याची प्रक्रिया राबविणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि तीव्र नाराजी निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन, त्यांचे म्हणणे ऐकून आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून दिल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
ही मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोदजी गाडे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले आणि दासाराम भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments