रॉयल्स कप फुटबॉल स्पर्धा २०२६ ला उत्साहात प्रारंभ ; १६ संघांसह नायजेरियन खेळाडूचा सहभाग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ जून २०२६ - फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण जिमखाना आणि फलटण एज्युकेशन सोसायटी स्पोर्ट्स कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रॉयल्स कप फुटबॉल स्पर्धा २०२६" ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. मुधोजी क्लब, फलटण येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेमुळे शहरातील फुटबॉलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून क्रीडा वातावरणाला नवसंजीवनी मिळाली आहे.
रॉयल्स कप फुटबॉल स्पर्धेत फलटण जिमखाना अ व ब, पोलीस बॉयज सातारा, रॉयल्स एफसी, साखरवाडी एफसी, टायगर एफसी, सूर्या एफसी सातारा, फ्लोरसेन्ट एफसी, एससीएफए सातारा, जय मातादी ईश्वरपूर, पीएसएस पुणे, बिलीव्हर्स बारामती, गुलमोहर एफसी, मंगळवार पेठ एफसी, आर्यन्स एफसी पुणे आणि अफ्रो बॅलर्स एफसी अशा एकूण १६ निमंत्रित संघांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत नायजेरियन फुटबॉल खेळाडूही सहभागी झाले असून त्यामुळे सामन्यांचा दर्जा अधिक उंचावला आहे. सर्व सामने दिवस आणि रात्री प्रकाशझोतात खेळवले जात आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १२ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता झाले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य शिवाजीराजे घोरपडे, फलटण जिमखाना सचिव अमित काळेसर, प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, व्ही. के. शेडगे, डॉ. एस. डी. निंबाळकर तसेच सौ. एस. एस. दीक्षित उपस्थित होते.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दीपकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील. तसेच नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेत विविध नामांकित संघांसह विदेशी खेळाडू सहभागी झाल्याने फुटबॉलप्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध संस्था आणि उद्योजकांचे सहकार्य लाभले असून फलटण एज्युकेशन सोसायटी व स्पोर्ट्स कमिटीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

No comments