Breaking News

श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यातून समाजविकासाची प्रेरणा - प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर

Inspiration for social development from the work of Shrimant Malojiraje Naik Nimbalkar - Prof. Laxmikant Vlekar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - फलटण संस्थानचे कर्तबगार अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयाच्या विशेष दिन समितीच्या वतीने जयंती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम होते. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी श्रीमंत मालोजीराजांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेतला.

    प्रा.वेळेकर सर म्हणाले, “श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे दूरदृष्टीचे आणि समाजहिताची जाण असलेले लोकनेते होते. शिक्षण, शेती, सहकार, पाणी, ग्रामीण विकास आणि सामाजिक समता या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.”

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, शेतकरी वर्गाला पाणी व कर्जपुरवठ्याच्या सुविधा मिळाव्यात आणि लघुउद्योगांना चालना मिळावी, यासाठी मालोजीराजांनी प्रयत्न केले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणविस्ताराला चालना देत विविध प्राथमिक शाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालयांच्या विकासाची पायाभरणी करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.

    सामाजिक समतेच्या क्षेत्रातील त्यांच्या पुरोगामी भूमिकेवर प्रकाश टाकताना प्रा.वेळेकर यांनी सांगितले की, अस्पृश्यता हा मानवी जीवनाला लागलेला कलंक आहे, या जाणिवेतून मालोजीराजांनी समतेचा पुरस्कार केला. माधवराव आहिवळे या दलित समाजातील व्यक्तीला कायदेमंडळावर सदस्य म्हणून नेमून,संस्थानात मानाचे स्थान देऊन त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला.

    महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातही मालोजीराजांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. महाराष्ट्र शासनातील सहकार मंत्री व बांधकाम मंत्री म्हणून  जबाबदारीच्या काळात महाराष्ट्र सचिवालयाची इमारत, कोयना धरणाचे काम आणि प्रतापगडावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांसारख्या महत्त्वपूर्ण कामे केली, मराठी मनाची अस्मिता जोपासली.

    अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम यांनी सांगितले की, “श्रीमंत मालोजीराजांचे कार्य एका संस्थानापुरते मर्यादित नव्हते. शिक्षण, शेती, सहकार, पाणी आणि सामाजिक समता यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाची दिशा त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.

    प्रमुख उपस्थिती म्हणून इतिहास विभागप्रमुख व विशेष दिन समितीचे अध्यक्ष प्रो.डॉ. संतोष कदम, प्रसिद्धी विभागाचे प्रमुख प्रो.डॉ. प्रभाकर पवार, इंग्रजी विभाग प्रमुख प्रो.डॉ. संजय दीक्षित, तत्वज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. नवनाथ रासकर, हिंदी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. नितीन धवडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल टिके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. अभिजीत कदम यांनी मानले. यावेळी, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य, विविध समित्यांचे समन्व्यक,प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments