Breaking News

ओझोनचे महत्व

गंधवार्ता SPECIAL -   ओझोनचे महत्व   The importance of ozone

    दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस 'ओझोन दिवस' Ozone Day म्हणून जगभर साजरा होतो. ओझोनचा थर (Ozone layer) हा पृथ्वीवासीयांसाठी एक मोठं वरदानच आहे. या ओझोनचे महत्त्व, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व या थराच्या संवर्धनासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. ओझोनचा थर, पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा स्तर, म्हणजे स्ट्रॅटोस्फीयरचा एक भाग आहे. ह्या ओझोनच्या थराला ओझोनोस्फियर देखील म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६ ते ३० किलोमीटर अंतरावर ओझोनचा एक थर असतो.

    आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीला सुरक्षित ठेवण्यात या ओझोनच्या थराचा मोठा वाटा आहे. सूर्य, पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी जितका पोषक आहे; तितकाच तो घातक देखील आहे. सूर्यापासून येणारी मध्यम अति-नील किरणे (Ultraviolet radiation) माणसामध्ये व इतर प्राण्यांमध्ये विविध आजार उत्पन्न करू शकतात. अशा या मध्यम अति-नील किरणांना शोषून घेत, ओझोन आपली रक्षा करतो. 

     सूर्यापासून निघणारी अतिनील प्रारणे पृथ्वीवर पोहोचू न देण्याचे कार्य ओझोनचा थर (Ozone layer) करीत असतो. सूर्यापासून निघणारी अतिनील प्रारणे ओझोनच्या थरात शोषली जातात हा ओझोनच्या थराचा महत्त्वपूर्ण फायदा आहे. दुसरा कोणताही पदार्थ वातावरणामध्ये ओझोनप्रमाणे अतीनील प्रारणे शोधू शकत नाही. ओझोनच्या थरामुळे ही अतिनील प्रारणे गाळली जातात त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे खूप फायदे होत आहेत.

    जर हा ओझोनचा थर (Ozone layer)  रिकामा झाला, विरला तर पृथ्वीवर सूर्याची अतिनील प्रारणे आदळतील व त्यामुळे नुकसान होऊ शकेल. भयंकर परिणाम जाणवत राहतील. वनस्पती, जलचर प्राणी, जीवजंतू यांचा नैसर्गिक समतोल ढळेल. कातडीचा कर्करोग व डोळ्यांवर सारा पटलाची निर्मिती होऊ लागेल. आता तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. मोठमोठ्या कंपन्या, उद्योगधंदे, अणूचाचण्या, लहान-मोठी युद्धे, विविध प्रकारचे स्फोट यातून बाहेर पडणारे रासायनिक घातक धुराचे लोट या सर्वांमुळे ओझोनचा थर विरळ बनत चालला आहे. असा प्रकार अंटार्क्टिका भूखंडाच्या वरच्या भागात घडून तेथील ओझोन थराला मोठे भगदाड पडल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांत दोन्ही ध्रुवांवर ओझोनच्या थराला मोठी छिद्रं पडलेली आहेत. या छिद्रांना 'ओझोन होल' असेही म्हणतात. नासाच्या 'ओझोन होल वॉच'तर्फे दररोज ओझोनवर लक्ष ठेवले जाते. 

    पृथ्वीचे तापमान वाढून अंटार्क्टिकावरील बर्फ वितळू लागून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. तेव्हा पुढे काय महासंकट ओढवेल याने जागतिक विचारवंत चिंतित झाले. त्यामुळेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरुद्ध 'वसुंधरा' परिषदेकडून व शास्त्रज्ञांकडून काही पावले उचलली जात आहेत. पृथ्वीभोवतालच्या ओझोन थराचे महत्त्वा व अल्ट्राव्हायोलेट किरणांचे दुष्परिणाम ओळखून जगभर जागृती घडावी म्हणून १६ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा होतो.

No comments