Breaking News

निंभोरे, मुरूम परिसरात दोन ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा लंपास

Copper wires were burnt by breaking two transformers in Nimbhore, Murum area

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - तालुक्यातील निंभोरे आणि मुरूम परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून नुकसान करण्यात आले असून, चोरी गेलेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

    महावितरणच्या फलटण ग्रामीण शाखा क्रमांक १ येथे प्रधान तंत्रज्ञ (लाईनमन) म्हणून कार्यरत असलेल्या सचिन श्रीरंग नाळे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान निंभोरे गावातील ‘स्वराज’ नावाच्या डीपी क्रमांक ४११३६४१ (२०० केव्हीए) चे वेल्डिंग तोडून त्यातील सुमारे १२० लिटर ऑईल सांडण्यात आले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील अंदाजे ८० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या तारांची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

    तसेच, ७ सप्टेंबर रोजी रात्री मुरूम गावच्या हद्दीतील ‘एरटेल’ नावाच्या डीपी क्रमांक ४११३८३१ (६३ केव्हीए) चे वेल्डिंग तोडून त्यातील सुमारे ४० लिटर ऑईल सांडण्यात आले. या ट्रान्सफॉर्मरमधील अंदाजे ३५ किलो तांब्याच्या तारा चोरीस गेल्या असून, त्यांची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    दोन्ही ठिकाणी पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments