भाऊ’ नावाचा आधारवड; संघर्षातून उभं राहिलेलं कर्तृत्वाचं ७५ वर्षांचं पर्व!
A supporter named 'Bhau'; 75 years of achievement that has stood the test of time!
जगण्याचा अर्थ शिकवून स्वावलंबी करणारे ते हात,
आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर सोडताना नेहमी थरथरतात
आणि मुलींच्या सुखासाठी वेळ पडली तर
हातपाय देखील जोडतात...
असा देवमाणूस म्हणजे ...... बाप..
असंच मी अनुभवलं आहे माझ्या आयुष्यात.. याच 'बाप' नावाची महती, धाक, उंची , जरब, प्रतिष्ठा, सावधपणा, चिकाटी, जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा आणि महत्वाकांक्षा ! हे सर्व मी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे आणि त्याचे सामर्थ्य, श्रीमंती, अभिमान मिरवला देखील आहे! जो आज माझ्या शब्दांमध्ये मांडायचा एक छोटासा प्रयत्न करतेय.
आज २० सप्टेंबर२०२६ , माझे वडील श्री. पांडुरंग बाजीराव पवार म्हणजेच आमच्या सर्वांचे भाऊ. त्यांचा आज वाढदिवस - जन्मदिवस !
मला खात्री आहे भाऊ तुमच्या सारखे श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही, मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
जन्म, बालपण ते २५ वर्षापर्यंतचा प्रवास :
आमच्या भाऊंचे वडील श्री. बाजीराव कृष्णा पवार आणि आई सौ. यशोदा बाजीराव पवार हे दांपत्य मूळ गुरसाळे ता. माळशिरस जि. सोलापूर यांना तीन मुले चंद्रकांत, पांडुरंग व शंकर आणि आनंदी ही मुलगी, वडील खूप शांत, समंजस, सांप्रदायिक वारसा असणारे माळकरी व्यक्ती, पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी करणारे, हरिपाठ भजन, कीर्तन यामध्ये असणारे! स्वातंत्र्यपूर्व काळातच ते फलटणमध्ये रोडरोलर चालविण्याचे काम करत होते.
त्यावेळी फलटणमध्ये असताना त्यांची ओळख श्री जगन्नाथ शिंदे कुटुंबियांशी झाली होती. काही वर्षे इथे राहून नंतर ते मूळ गावी शेतीसाठी व कौटुंबिक सौख्यासाठी गुरसाळेला परत गेले. विशेष म्हणजे आजोबा फलटणमध्ये नोकरी करत असतानाच भाऊंचा जन्म याच भूमीत झाला.
प्राथमिक शिक्षण इ ५ वी पर्यंतचे जि.प. शाळा गुरसाळे याठिकाणी झाले. मोठे चुलते फलटणला शिक्षणासाठी होते व धाकटे चुलते देखील. त्यामुळे शेतीची सर्वस्वी जबाबदारी भाऊंवर पडली. त्याकाळी विशेषतः ५ वी पर्यंतच शाळा गावोगावी होत्या. त्यावेळी त्यांनी शेतीमध्ये चांगली मेहनत घेऊन चांगले उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला. गुळाचे गुऱ्हाळ सुरु केले त्या काळात गुळाच्या गुऱ्हाळाची खासियत होती. लोकांचा कल साखर कारखान्यांपेक्षा गळीत करण्याकडे असायचा, शेती, . गुऱ्हाळ, गायी - दुग्ध व्यवसाय, बैलजोडी इ. गोष्टींवर भाऊंनी भर दिला.
प्रचंड कष्ट करण्याची तयारी असल्याने त्या काळात एका दिवसाला १८ आदणे गुऱ्हाळात काढायची त्यांची तयारी होती. या त्यांच्या कौशल्याची शेतकरी वर्गात चर्चा असायची.
असे हे शेतकरी कुटुंब अगदी व्यवस्थित उपजीविका करत होते. 'आमची आजी चे माहेर म्हणजे भाऊंचे मामा घाडगेवाडीचे तुपे अतिशय श्रीमंत घराणे. राजकीय वारसा असलेले व सर्वचजण दहशत निर्माण करणारे असे होते. त्यामुळे आजी खूप कडक स्वभावाची होती.
आजीला तिची भाची सून म्हणून भाऊंसाठी करायची होती पण आमच्या भाऊंनी गावातीलच माने कुटुंबियातील माझी आई सुलोचना हिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आमच्या आजीला राग आला. कारण तिची भाची दिसायला सुरेख नव्हती जेवढी आमची आई सुंदर होती पण गरीबाघरची होती. भाऊने तसे आजीला सांगितले होते. जन्माचा जोडा असतो मी मामाच्या मुलीबरोबर लग्न करणार नाही. यातून त्यांच्यातील निर्णयक्षमता लक्षात येते.
पुढे 1979, 1982, 1985 साली संध्या, सविता, विशाल अशा आम्हा तिघांचा जन्म झाला व संसाराचा गाडा पुढे सुरू झाला. जबाबदारी माणसाला बळ व धैर्य देते. अगदी असेच भाऊंना वाटू लागले.. मला दोन मुली आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार त्यांना कष्ट करण्यासाठी प्रवृत्त करायचा.
जवळजवळ वयाच्या 38 व्या वर्षी भाऊ1990 साली 'फलटण मध्ये आले त्यावेळी रसवंतीचा व्यवसाय सुरु केला व दुसऱ्याच वर्षी 1991 ला मुलांना शिक्षणासाठी घेऊन येण्याचा निर्णय घेतला. तसे पाहता गुरसाळे मध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त असे घर, पाणी मुबलक, गायी -घरी दूध-दुभते भरपूर, भाजीपाला घरचाच, कोणत्याच गोष्टीची उणीव नव्हती परंतु प्रत्येक गावातील राजकारण खूप वाईट असते आणि त्यामुळे लोकांची वृत्ती, दृष्टीकोण खूप खालच्या थराला जातात. आमच्या भाऊंचा स्वभाव खूप कडक, स्पष्ट बोलणारा, भावी परखड, अन्याय सहन न होणारा, तापट, स्वाभिमानी त्यामुळे गावातील राजकीय लोकांना त्यांच्याबद्दल असूया होती. यासाठीच आमच्या आप्पांनी (मोठे चूलते) भाऊंना फलटणला ठेवण्याचा निर्णय घेतला. आप्पांचे शिक्षण 11 वी पास होते. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठीची तयारी केली व त्या निमित्ताने भाऊंच्या स्वभावात बदल होईल किंवा बाहेरील जग अनुभवताना गावातील वाद संपुष्टात येतील. यामध्ये 'वस्तुत: आप्पा यशस्वी ठरले. व खऱ्या अर्थाने आमच्या भाऊच्या आयुष्याचा संघर्ष सुरु झाला . फलटणला आल्यावर अतिशय हालाखीचे दिवस आमच्या वाट्याला आले याठिकाणी भाड्याने राहणे ५ मुलांचे शिक्षण व त्याचा खर्च हे शेतकरी व्यक्तीला न परवडणारी गोष्ट होती.
आम्ही ४ भावंडे सुरुवातीला शिक्षणासाठी आलो. आण्णा' (मनोज) मुधोजी हायस्कूलला, मी व सविता वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलला तर विशाल मालोजीराजे प्राथमिक शाळेत. हळूहळू आम्ही शिक्षणाबरोबरच परिसरात ओळख होऊन लोकांशी संपर्क वाढू लागला. आई व भाऊच्या चांगल्या स्वभावामुळे ओळख वाढू लागली. त्यातच माझे पोटाचे दुखणे सुरु झाले व सतत दवाखाना आणि खर्च होऊ लागला. माझे अपेंडिक्सचे आपरेशन झाले, त्यानंतर 6 महिन्यात आतड्याला पीळ पडले व दुसरे ऑपरेशन झाले व माझी काळजी वाढली. त्यावेळी अक्षरशः मृत्यूच्या दारातून मला माघारी आणले ,ते प्रसंग तर खूप थरारक होते.
रसवंती बंद झाल्यावर भाऊंनी गिरणीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, गिरणी टाकताना देखील त्यांना चालेल का, अशी भीती वाटायची ? रात्र रात्र झोपायचे नाहीत, पण भोसले काका भाऊंना खूप आधार घ्यायचे व समजून सांगायचे. भाऊच्या सुरुवातीच्या काळात भोसले काकांसारख्या मित्राची, सल्लागाराची भाऊंना खूप मदत झाली आणि आजही ती आहे.
बघता बघता, भाऊ गिरणी व्यवसायात स्थिरावले ४ महिने रसवंती व 8 महिने शेती व गिरणी ! शाळेमध्ये सुरुवातीला आम्ही बहिणी 6 महिने युनिफॉर्म शिवाय शाळेत जात होतो तर शाळेत आम्हाला रोज उभे करायचे युनिफॉर्म नाहीत म्हणून शेवटी शाळेतील ज्यु. कॉलेजचे प्रा. भोसले सर यांनी भाऊंना युनिफॉर्मसाठी उसने पैसे दिले व आम्हाला युनिफॉर्म मिळाला, अशा अत्यंत वाईट प्रसंगांना त्या काळी तोंड दयावे लागले, विशालला तर २ रु. त्याकाळात परीक्षा फी होती त्यासाठी ६ महिने वायसे स्कूलचे शिक्षक फी मागत होते. एक दिवस विशाल दळणाचे पैसे आल्यावरच फी घेऊन जायचे म्हणून घरी राहिला व शाळेत गेला नाही दिवसभर न जेवता गिरणीत बसून होता पण, दळण घ्यायलाच कुणी आले नाही. शेवटी संध्याकाळी भाऊ शेतातून आल्यावर भाऊंनी पाहिले की विशाल 5 वाजले तरी गिरणीत आहे पण कुणाचे पैसे आलेच नाहीत व त्याला खूप वाईट वाटले. मग संध्याकाळी उशीरा दळण गेली व त्यातील पैसे भाऊंनी विशालला दिले व दुस-या दिवशी त्याने फी भरून शाळा अटेंड केली.
असे कित्येक प्रसंग, आयुष्यात आले व न डगमगता अशा आर्थिक व प्रासंगिक कित्येक घटनांचा सामना करत आयुष्यातील संघर्षावर मात केली. रोज नवी आव्हाने नव्या अडचणी यातून जीवन क्रमत होते. माझी १२ वी झाली माझे लग्न झाले. त्याच वर्षी सचिन ग्रामसेवकच्या कोर्ससाठी फलटणला शिक्षणाला आला.
आयुष्यातील संघर्ष सुरूच होता. रोज नवनवीन संकट येतच होती आणि नव्या अडचणी पण आई व भाऊ त्यातून मार्ग काढत जीवन क्रमत होते. त्यात मी 7वी मध्ये असतानाच भाऊंनी माझे लग्न जमवले होते. माझी 10 वी झाली व माझ्यासासरची मंडळी लग्नासाठी विचारणा करू लागली . माझे सासरे वारल्यामुळे एक वर्षात किंवा 3 वर्षानंतर लग्न करावे लागते ही पद्धत! त्यामुळे भाऊंनी 3 वर्षानंतर लग्न करू असे सांगितले. तोवर तिची 12 वी होईल असे सांगून वेळ वाढवून घेतला.
घडले असे माझ्या सासऱ्यांना भाऊंनी शब्द दिला होता की माझी मुलगी देतो म्हणून व ते अचानक 1992 साली वारले. परंतु मी फलटणमध्ये असल्यामुळे भाऊचा संपर्क वाढला व माझ्यासाठी खूप स्थळे येऊ लागला आणि भाऊंना त्या लोकांना तोंड द्यावे लागायचे. की माझ्या मुलीचे लग्न जमले आहे. वारंवार मागणी घालू नका व तसे माझे वय लहानच होते पण तेव्हा 18 वर्षे पूर्ण होईपर्यंतच लग्नाची बोलणी केली जात होती. अशातच भाऊंनी माझी १२वी झाली की एप्रिल मध्ये सुपारी व मे मध्ये लग्न केले.विशेष म्हणजे त्या काळात भाऊंनी 1996 साली साधुबुवा मंदीरात माझे लग्न लावून माझी बिदाई करून 5 वाजायला गिरणीत आले होते. भाऊंनी कधीच गिरणी बंद ठेवली नाही. कारण आमचे संपूर्ण कुटुंब त्यावर चालत होते. 'कसेतरी फलटण मध्ये चांगला जम बसवण्यात भाऊ यशस्वी झाले तोवर माझ्या सासरच्या कित्येक गोष्टी समोर आल्या व लग्नानंतर 2 महिन्यातच भाऊ हताश झाले. माझे पती शासकीय नोकर असल्याने भाऊंनी माझे लग्न लावून दिले. नोकरी चांगली आहे भविष्याची काळजी नाही. परंतु कधी कधी चांगले करण्याच्या ओघात व्यक्ती चुकतो असेच काहीसे माझ्या पतीकडून झाले. वडील वारले, नवीन जबाबदारी खांदयावर पडली. शेती, आई, दोन बहिणी त्यांची छोटी छोटी २-२ मूले व धाकटा भाऊ असे त्यांचे कुटुंब - चांगले करण्याच्या ओघात चुकीच्या मित्रांची संगत लागली व व्यसनाधीनतेकडे कल वाढला, तो एवढा की कर्जबाजारी झाले व जमीन, घर गहाण ठेवावे लागले अशा परिस्थितीत मी त्या घरी गेले.
हे सर्व भाऊंना समजल्यावर भाऊ रात्रंदिवस झोपत नव्हते त्यांनी माझ्या आयुष्याचा निर्णय चुकला म्हणून जो पश्चाताप करून घेत होते ज्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत गेली. परंतु त्यावर त्यांनी पर्याय शोधला, आणि हा पर्याय म्हणजे एका मुलीच्या आयुष्यासाठी फार मोठा होता. एक बाप मुलीसाठी काय करू शकतो याचे खूप मोठे उदाहरण.
माझे भाऊ व भोसले काका मित्र. त्यांच्याशी सल्लामसलत करून विकासला यातून बाहेर काढायचे असे ठरवले. भोसले काका व उत्तमराव फडतरे हिंदुराव कापसे ही मंडळी त्यावेळी मालोजीराजे बँकेत चांगल्या पदावर काम करत होती. भोसले काकांनी वैयक्तिक स्वरुपात या दोन त्यांच्या सहकायांच्या मदतीने आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. व भाऊंना आधार आला, दुसरीकडे भाऊंनी सर्व पाहुणे मंडळींची यादी केली व बैठक बोलावली. आमच्या घरी येऊन गावातील प्रतिष्ठित मंडळींना बोलावून सर्वांसमक्ष कर्जाची यादी जावयाकडून घेतली व ते सर्व कर्ज फेडण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन केले अन्यथा माझ्या मुलीला रोज दुस-याच्या शेतात खुरपणी करायला जावे लागेल आणि भाऊ धडाधडा रडले.
एक बाप एका मुलीसाठी काय करू शकतो याचे हे उदाहरण | मुलीच्या प्रेमासाठी, तिच्या आयुष्यासाठी, तिच्या स्वप्नांसाठी वडील किती हळवे होतात समाजात आपल्या मुलांनी चांगले आयुष्य जगावे यासाठी धडपड करतात हे यावरून स्पष्ट होते. ऑगस्ट 1996 साली घडलेली ही घटना, आजही अंगावर शहारे आणते, आणि खरोखर सर्व पाहुणे मंडळीनी त्याकाळात भाऊंच्या शब्दाचा मान राखून कुणी आर्थिक मदत केली तर तर कुणी २ तोळे, ४ तोळे, ५ तोळे सोने देऊन मदत केली. व त्या काळात असणारे जवळजवळ 10 लाख कर्जापासून माझ्या पतीची सुटका केली आणि फक्त कर्जातूनच नाही तर माझ्या पतीची व्यसनातून देखील सुटका केली. सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी त्यांना घेऊन गेले व त्यांच्या पौर्णिमेची वारी करायला सांगितले. विशेष म्हणजे आजही माझे पती महाराजांची वारी करतात व भाऊंच्या शब्दाचा मान राखून आज ते निर्व्यसनी तर आहेतच पण एक आदर्श व्यक्ती म्हणून सन्मानाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी भाऊंच्या मनात पुन्हा जागा निर्माण केली, ते नेहमीच भाऊना वडिलांच्या जागी पाहतात कधीच चुकून ते भाऊ किती रागावले, तरी प्रतिशब्द करत नाहीत. अगदी मुलासारखे भाऊही त्यांच्याशी वागतात. हीच या दोघांमधील नात्याची खरी ओळख आहे . हे कायम भाऊंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्यामुळेच मला एवढी चांगली पत्नी, २ मुले मिळाली. मी जमीन खरेदी करू शकलो, बंगले 2 ठिकाणी बांधू शकलो बारामतीसारख्या ठिकाणी जागा घेता आली तसेच कितीतरी इस्टेट नव्याने घेऊ शकलो ते फक्त भाऊंच्या मुळेच! असे शब्द नकळत अण्णासाहेबांच्या मुखात कायम असतात.
अशा तऱ्हेने स्वताचा संसार सांभाळत भाऊंनी मोठी मुलगी म्हणून सुरुवातीच्या काळात माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत याचे ऋण मी कधीच फोडू शकत नाही परंतु त्यांच्या संस्कारानी, विचारांनी मी कायम त्यांच्याप्रती विनम्र कृतज्ञ आहे व असेन. यानंतर सविताचे लग्न - माझ्या लग्नाच्या चुकलेल्या निर्णयामुळे भाऊंना एवढा पश्चाताप होत होता कि त्यांनी सविताला जवळच्याच नात्यात देण्याचा विचार केला. व माझे मामा श्री.भीमराव माने यांचा मुलगा श्री. प्रदीप माने यांच्याशी २००० साली तिचा विवाह करून दिला मामा मुळचे श्रीमंत होते त्यामुळे भाऊंना तिची काळजी नव्हती पण सविता भाऊंची लाडकी होती. तिने भाऊंना शेती व्यवसायात रसवंतीत खूप हातभार लावला होता.लहान होती पण खूप हुशार होती.
शिस्तीची स्वभावाने कडक आणि व्यवहारिक त्यामुळे ती नागपूरला म्हणजे खूप दूर याचे त्यांना खूप दु:ख वाटायचे. अशातच मी फलटणमध्ये असल्याने माझी मुले इथे शिकत होती, त्यामुळे सतत मामाकडे असायची त्यामुळे सविताचे दु:ख थोडे विसरायचे. माझ्या मुलांना भाऊंचा खूप सहवास मिळाला. पहिली नातवंड असल्याने ऋषी तर नेहमी तिकडेच असायचा आणि आजही असतोच पण भाऊंनी त्यांचे सर्व हटट पुरवले.माझ्या छोट्यावर तर भाऊंची एवढी सावली पडली होती बरेच जन हणमंतवाडीला त्याला दुसरा पांडुरंग पवार म्हणायचे.
आयुष्य कुणासाठी थांबत नाही. संघर्षातून मार्ग काढणाऱ्या व आव्हानांचा सामना करणाऱ्या तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी चांगल्या विचारांचा, हेतूचा व प्रामाणिकपणाचा, सत्याची कास धरणाऱ्या लोकांना यश मिळतेच हे आमच्या भाऊंच्या जीवनातून कळते. त्यांचे समर्पण एखादया फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा जन्म घेऊन आकाशाला गवसणी घालते.
विशालचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले व आम्ही सर्वजण म्हणजे आण्णा – वहिनी मी माझे पती व विशाल सविताकडे गेलो. त्यावेळी मी लग्नानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करून बी. एड केले होते. माझ्या मिस्टरांचे एम. ए. पर्येंतचे शिक्षण होते. त्यामुळे त्यांनी माझ्या शिक्षणाला खूप पाठिंबा दिला अगदी माझी बी. एड.ची त्याकाळची फी जवळ जवळ एक लाख रु देखील त्यांनी सहखुशीने भरली होती. व मी देखील बी.एड. करून विशेष प्राविण्य मिळवले. त्याच वेळी गोंदियाला गेलो तिथून येताना खूप मोठा विचार झाला. व शिक्षण संस्था फलटणमध्ये सुरु करायची हे ठरले, 2006-07 ली माझे बी. एड. झाले, सप्टेंबर 2007 ला शिक्षण संस्थेची स्थापना व जून 2008 ला ही प्रोग्रेसिव्हची स्थापना!! खर तर आमच्या सर्वांसाठी हे आव्हानच होते. पण हेतू खूपच पवित्र होता. पिढी घडवायची शिक्षणाने समाज समृद्ध होतो. चांगले शिक्षणच मुलांना चांगले विचार, जीवन व योग्य दिशा देतात आणि यासाठीच या शैक्षणिक संकुलाची निर्मिती झाली.
आमच्या भाऊंना त्यावेळी पुन्हा रात्रंदिवस झोप येत नव्हती. आपण पिठाची गिरणी , रसवंती चालवणारी, शेतकरी लोक, आपल्यावर कोण विश्वास ठेवणार! कसलाही राजकीय किंवा कौटुबिक वारसा नसताना शिक्षण क्षेत्रातील हे पाऊल आपल्याला पेलता येईल का? पण नियतिच्या मनात वेगळच होत.
मी भाऊंना खूप विश्वासाने सांगितल, भाऊ कुणाच्याही मागे लागायचं नाही, फक्त करून दाखवायचे आणि ते कसे करायचं यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खात्रीने सांगते की हे स्कूल फक्त गुणवत्तेवर चालेल आणि गुणवत्ता दिसली की आपोआप प्रवेश होतील . तुम्ही कसलीच चिंता करू नका. आज 20 वर्षांचा टप्पा पूर्ण होताना दिसत आहे व या संस्थेच्या दोन शाखांमध्ये हजारो विद्यार्थी घडत आहेत. हे देखील फक्त चांगल्या निकोप व स्वच्छ विचारांमुळेच! भाऊंनी या शाळेसाठी खूप योगदान दिले आहे. त्यांची चिकाटी , कष्ट करण्याची तयारी व प्रामाणिकपणाच आम्हाला देखील ही संकुल चालवायला प्रेरणा देतात आणि म्हणूनच हे शक्य झाले. विशालचा स्वभाव खूप मनमिळाऊ व मोठ्या मनाचा । त्यामुळे मान्यता मिळवताना त्याचा खूप फायदा झाला आणि खूप यश ही शिक्षण संस्था चालवताना मिळाले. त्यांचे राजकीय लोकांशी व अधिकारयांशी असलेल्या ओळखीचा फायदा कायमच सर्वांना होतो. कायम तळागाळातील लोकांपासून उच्च दर्जाच्या लोकापर्यंत त्याचे असलेले संबंध ही शिक्षणसंख्या मोठी होण्यात /करण्यास यशस्वी ठरले.
आज संस्थेचा १९ वा वर्धापनदिन व भाऊंचा ७५ वा वाढदिवस या दोन गोष्टी एकत्र होत आहेत यात भाऊच्या आयुष्याची सोन्यासारखी उजाळलेली आयुष्याची वाटचाल आहे. आजही त्यांच्यात कष्ट करण्याची उमेद आहे. स्वाभिमानी स्वभावामुळेच ते इथपर्यंत पोहोचलेत हे निश्चितच.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात नको तिथे कधीच खर्च केला नाही, श्रीकृष्णाच्या गीते नुसार कर्म सिद्धांताला महत्व देणारे आमचे भाऊ आजही स्वकष्टाने जगत आहेत. या वयात देखील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आयुष्याच्या वाटचालीत भक्कमपणे साथ देणारी पत्नी लाभली. जिच्या साथीने हे आयुष्य त्यांनी खूप ताकदीने पेलले. या उंचीवर जाताना नक्कीच त्यांना तिच्या कष्टाची, साथीची आणि तिच्यातील धैर्याची जाणीव होत असेल.
अतिशय सुंदर असे सहजीवन या शब्दांना सुद्धा मर्यादा पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व.. समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी असणारे त्यांचे संबंध निशिचतच कौतुकास्पद आहेत, त्यांच्यातील निस्वार्थ वृत्तीमुळेच ते आज वेगळ्या उंचीवर आहेत.
एका साध्या शेतकरी माणसाने जपलेली माणुसकी, जोडलेला समाज आणि निर्माण केलेली ओळख, नक्कीच विचार करण्यासारखी आहे, समाज बनतो तो कित्येक कुटुंबांनी आणि अशाच कितीतरी कुटुंबांच्या चांगल्याचा विचार करणारा, मनाने श्रीमंत असणारा हा अवलिया माणूस जो कधीच तत्वांशी तडजोड करत नाही.
वास्तूशास्त्र, भविष्य, अशा बाबींना बळी पडणे त्यांच्या स्वभावातच नाही, फक्त स्वताच्या कष्टावर व प्रामाणिकपणावर विश्वास असल्यामुळे आज समाजात त्यांची वेगळी। ओळख आहे.
संस्थाचालक म्हणून असणारी त्यांची ओळख, त्यांनी घडवलेल्या तिन्ही मुलांची शिक्षणाबद्दलची तळमळ, त्यांच्यातील चांगले करण्याची वृत्ती, इतर नातेवाईकांच्या मुलांना सातत्याने चांगली शिकवण देणे, स्वतः च्या नातवंडांना तर त्यांनी त्यांच्या तालमीत असे घडवले आहे की कुठेजरी ही मुले गेली तरी स्वत:चं अस्तित्व निर्माण करणारच !
असे हे भाऊंचे बहुआयामी व्यक्तिमत्वा बद्दल किती लिहावे हे समजत नाही, ७५ वर्षांची कारकीर्द संक्षिप्तपणे लिहिणे म्हणजे अशक्यप्राय आहे. तरीही एक प्रयत्न केला आहे.
भाऊ, तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही तर कित्येक कुटुंबांचा आधार, त्यांचे जीवनदाता आहात! तुमच्या सहवासाची सावली ज्याला लाभली तो त्यांच्या जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही! तुमच्या शब्दांची धार, विचारांचा प्रवाह आणि कृतीची धमक तुमच्यातील कर्तृत्ववान व्यक्तीची जाणीव करून देते. तुमच्यासारख्या समाजशील, नीतीवान आणि दूरदृष्टी असणाऱ्या वडिलांची आम्ही मुले आहोत याचा आम्हा तिघा भावंडांना सार्थ अभिमान आहे.
आयुष्यभर आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञ असू व तुमच्या ऋणात राहू.
आपणास वाढदिवसाचे अभिष्टचिंतन !
सौ. संध्या विकास गायकवाड
व्यवस्थापकीय संचालिका ,
सरस्वती शिक्षण संस्था संचलित
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल
अँड ज्युनिअर कॉलेज
कोळकी फलटण

No comments