चालक हा वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक - सचिन विधाते ; फलटणमध्ये चालक-मालक दिन उत्साहात
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ : फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात चालक-मालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या रिक्षाचालकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
दळणवळण व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, या व्यवस्थेत वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. फलटण शहरात नियमांचे पालन करून प्रवाशांना सुरक्षित वाहतूक सुविधा देणाऱ्या चालकांचा योग्य सन्मान होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी केले. चालक-मालक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी रिक्षामध्ये विसरलेल्या मौल्यवान वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकांचा आरटीओ विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ रिक्षाचालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक शफिक उजगावकर, मोटार वाहन निरीक्षक नवाब मुजावर, चालक संतोष गोडसे, क्लार्क उमाकांत दीक्षित, फलटण आगार व्यवस्थापक सौफिया मुल्ला, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी, बाबुराव खाडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे, पत्रकार राजेंद्र गोडसे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब अहिवळे यांनी केले, तर उदय काकडे यांनी आभार मानले.

No comments