Breaking News

स्वच्छ व सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण दूध संकलनासाठी गोविंद मिल्कचे भव्य उजळणी शिबिर संपन्न

Govind Milk’s grand refresher workshop for clean, safe, and high-quality milk collection concludes successfully.

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ : महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांच्या मुंबई येथे १२ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर, स्वच्छ व आरोग्यपूर्ण दूध संकलन आणि तितकेच गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी अग्रेसर असणाऱ्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, फलटण जि.सातारा यांच्यावतीने त्यांच्या सर्व दूध बल्क कुलर चालक, सेंटर चालक आणि तेथील कर्मचारी यांच्यासाठी उजळणी शिबिर सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे घेण्यात आले. यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे ६५० जणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. असे उजळणी शिबिर व्हावे, यासाठी गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), संचालिका श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.धर्मेंद्र भल्ला यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात विशेष सूचना दिल्या होत्या.

    यावेळी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे दूध संकलन विभाग प्रमुख डॉ.गणेश सपकळ तसेच श्री.बापूसाहेब हिप्परकर आणि श्री.ज्ञानेश्वर शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोविंदचे सर्व दूध संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    गेली ३० वर्ष सातत्याने गोविंद मिल्क स्वच्छ, ताजे व गुणवत्तापूर्ण दूध संकलन करीत आहे. गोविंदच्या स्वच्छ आणि पारदर्शक अशा यंत्रणेमुळे गोविंद मिल्कच्या ३५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तसेच  संकलन करणाऱ्या सर्व बल्क कुलर चालक व सेंटर चालक यांना स्वच्छ, आरोग्यदायी व गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादन करण्यासाठी गोविंदाच्या दूध संकलन विभागातील सर्व अधिकारी अतिशय सचोटीने आणि जिद्दीने कठोर परिश्रम घेत आहेत, त्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून आज गोविंद मिल्क सर्वोत्तम दर्जाचे कच्चे दूध संकलन करणारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नावारुपास आली आहे. 

    शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा किफायतशीर, कमी कष्टाचा व नाविन्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये किंवा बल्क कुलर वर देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व यंत्रणा व अनुभवी तज्ञ अधिकारी यांचा समावेश गोविंदच्या दुग्ध व्यवसाय विकास प्रशिक्षण विभाग मध्ये आहे. या विभागाची वाटचाल विभाग डॉ.शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून  अतिशय नाविन्यपूर्ण, आधुनिक आणि उल्लेखनीय पद्धतीने चालू आहे.

    गोविंद डेअरी मध्ये संकलित होणाऱ्या सर्वोत्तम दर्जाच्या कच्च्या दुधामुळे, अव्वल दर्जाचे पिशवीबंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि वितरित करणारी डेअरी म्हणून आज गोविंद डेअरीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नावलौकिक कमावला आहे. याचे श्रेय डेअरीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धर्मेंद्र भल्ला आणि गोविंदाच्या सर्व कुशल कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाते.

    गोविंद मध्ये जरी मुंढे साहेबांना अपेक्षित आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सर्व अटी व नियम यांची पूर्तता  करणारे गुणवत्तापूर्ण दूध संकलन पूर्वीपासूनच होत असले तरीही या उजळणी शिबिरामुळे याच्यामध्ये नक्कीच आणखी भर पडेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

No comments