फलटणच्या लोकांनी ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्याचे काम केले - लक्ष्मण हाके ; 24 मार्चला फलटण मध्ये मोर्चा
People of Phaltan worked to take away reservation of OBCs - Laxman Hake; March in Phaltan on March 24
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ - फलटण पंचायत समिती सभापती निवडीत येथील दोन्ही राजकारण्यांनी कायदा पायदळी तुडवून घटनेची पायमल्ली केली आहे.बेकायदेशीरपणे पंचायत समिती सभापतीपदी गैर ओबीसी व्यक्ती बसवून, फलटणच्या लोकांनी ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्याचे काम केले असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
फलटणमध्ये पंचायत समिती सभापती पदावरून ओबीसी बांधव आक्रमक झाला असून आज मंगळवारी दि.17 रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आले होते. यावेळी सर्व ओबीसी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज बांधवांची चर्चा करून नंतर शासकीय विश्रामगृह ते तहसील कार्यालयावर सर्वांनी एकत्रित जात निवेदन देऊन तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.
यानंतर तहसील कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले की काल झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडी संपन्न झाल्या. त्यामध्ये मूळ ओबीसींवर अन्याय झाल्याची लाट फलटण तालुक्यातील ओबीसी बांधवांमध्ये पाहायला मिळाली . साखरवाडी गणाच्या शिवांजली भोसले या कुणबी प्रमाणपत्रावरती ओबीसी या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या.त्याचबरोबर फलटण पंचायत समिती मध्ये ओबीसीचे नऊ सदस्य निवडून आले आहेत मात्र मूळ ओबीसी समाजातील सदस्य निवडून आले असताना सुद्धा मूळ ओबीसींना डावलून गैर ओबीसी समाजाला सभापती पद दिले. मूळ ओबीसींनी आता जगायचे का नाही असा प्रश्न प्रा.लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
फलटणच्या राजकीय मंडळींनी ओबीसी बांधवांचा फक्त मतांसाठीच वापर केला असून त्यांना सभापती पद ओबीसीसाठी राखीव असताना ओबीसी चालत नाही का असा सवाल प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केला.
ओबीसी समाजाच्या भावना तहसीलदारांपर्यंत पोहोचवल्या असून लवकरच फलटण मधून मोठ्या आंदोलनाची सुरुवात मोर्चाद्वारे करणार आहोत. राज्यात ओबीसी समाजाला जाणून बुजून अडचणीत आणण्याचे आणि त्यांचे आरक्षण संपविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी करून फलटण मधील राजकीय नेते मंडळींवर जोरदार टीकास्त्र सोडले.असून हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा हाके यांनी दिला आहे.

No comments