Breaking News

नीरा नदीवरील पाणीपट्टी नोटिसांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Swabhimani Shetkari Sanghatana warns against water tax notices on Nira River

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० मार्च २०२६ -  नीरा नदीवर मोटारीद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाकडून बजावण्यात आलेल्या थकीत पाणीपट्टी नोटिसांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, फलटण यांना निवेदन देण्यात आले आहे.

    संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि वाढलेले उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी नोटिसा बजावणे हे अन्यायकारक असून शेतकरीविरोधी निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    संघटनेने प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या थकीत पाणीपट्टी नोटिसा तात्काळ रद्द करणे, थकबाकी माफ करणे किंवा मोठ्या प्रमाणात सवलत देणे, तसेच भविष्यात पाणीपट्टी आकारणी करताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे यांचा समावेश आहे. याशिवाय पाणीपट्टी वसुली पथकाची कारवाई थांबवावी, शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करू नयेत आणि पाणी उपसा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

    दरम्यान, या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

    या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुका अध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments