Breaking News

श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरातील कंपाउंड वॉलमुळे वाहतुकीस अडथळा; पीडब्ल्यूडीच्या जागेवरील अतिक्रमणावरही कारवाई करा; नंदकुमार मोरे यांची मागणी

Traffic is obstructed due to the compound wall in the area of ​​Shrimant Maloji Raje Statue; Action should also be taken against encroachment on PWD land; Demand of Nandkumar More

    फलटण, दि. ५ जून (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण नगर परिषद प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू असताना, श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) जागेवरील अतिक्रमणावरही तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार संभाजी मोरे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालखी महामार्गावरील श्रीमंत मालोजीराजे पुतळा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निवासस्थान असून त्याची कंपाउंड वॉल रस्त्याच्या हद्दीत आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. तसेच या ठिकाणी वळण घेताना समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने वारंवार अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

    सदर जागेवरील अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून वाहतुकीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील संबंधित अतिक्रमणाचाही समावेश करून ते हटवावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

    सार्वजनिक हित, वाहतुकीची सुरक्षितता आणि पालखी मार्गावरील सुरळीत वाहतूक लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments