स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट ; अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा
सातारा, दि ५ प्रतिनिधी : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी शुक्रवारी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रिती हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
जगताप म्हणाले की, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्य, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकदिलाने काम करत असून त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल.
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, निधी वितरणातील असमतोल आणि विकासकामांचा रखडलेला वेग हे प्रमुख प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे सांगितले. अनेक नाराज लोकप्रतिनिधी आणि अपक्ष सदस्यांचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
आगामी निवडणूक ही केवळ पक्षीय राजकारणाची नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी लढली जाणारी निवडणूक असल्याचे सांगत अभयसिंह जगताप यांनी मतदार प्रतिनिधींना विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

No comments