दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतूसासह चार जण जेरबंद ; ग्रामीण पोलिसांची कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ जून २०२६ : फलटण ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, पल्सर मोटारसायकल व तीन मोबाईल फोनसह एकूण २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतीक प्रमोद खुंटे हा साथीदारासह गावठी पिस्टल घेऊन मौजे दुधेबावी (ता. फलटण) येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरात सापळा रचला.
दरम्यान, पल्सर मोटारसायकलवरून जाणाऱ्या संशयितांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फलटण-दहिवडी मार्गे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून प्रतीक प्रमोद खुंटे (वय २५, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. भादे, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे (वय २१, रा. काळुबाईनगर, साखरवाडी, ता. फलटण) यांना शिताफीने ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान प्रतीक खुंटेच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. पुढील चौकशीत त्याने आणखी एक गावठी पिस्टल करण कानिफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण) याला समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे (वय २२, रा. मांडवखडक, ता. फलटण) यांच्या मदतीने विकल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन दुसरे गावठी पिस्टलही जप्त केले. या कारवाईत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक पल्सर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी प्रतीक खुंटे आणि करण घोलप यांच्यावर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

No comments