Breaking News

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दोन देशी गाईंची सुटका ; वाहनासह दोघांवर गुन्हा

Two indigenous cows being taken for slaughter rescued; Two booked along with vehicle

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ जून २०२६ : फलटण ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दोन देशी गाईंची सुटका करून अशोक लेलंड टमटम वाहन जप्त केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास गोरक्षकांकडून फलटण-पंढरपूर रोडवरून अशोक लेलंड टमटम (क्र. एमएच ४५ एएफ २६५३) मधून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

    या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल ढोले व इतर पोलिसांनी कुरवली पाटी (ता. फलटण) येथे नाकाबंदी करून संशयित वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन देशी गाई अत्यंत क्रूरपणे, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

    याबाबत चालक व सहचालकाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गुरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे वाहनासह दोन्ही गाई ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. गाईंची सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत व्यवस्था करण्यात आली आहे.

    या प्रकरणी प्रकाश रामचंद्र वाघमोडे (रा. ६० फाटा, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि बाळू अंबू सरगर (रा. नातेपुते, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मठपती, पो.हवा. खरात, पो.हवा. चांगण, पो.कॉ. ढोले व त्यांच्या पथकाने केली.

No comments