सातारा जिल्हा परिषदेमध्ये अखेर भाजपचा झेंडा ; अध्यक्षपदी प्रियाताई शिंदे उपाध्यक्षपदी राजू भोसले
सातारा (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० मार्च २०२६ - अत्यंत अटीतटीच्या आणि राजकीय खेचाखेचीच्या राजकारणामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अखेर भाजपने बाजी मारली. बहुमताचे पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी व शिवसेनेला बाजूला ठेवत भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे हे धुरंदर ठरले. शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नाट्य रंगलेल्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत अखेर भाजपच्या प्रियाताई शिंदे यांचे अध्यक्षपदी तर बाबाराजे समर्थक राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली.
दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार यावेळी नोंदवण्यात आली होती. सदस्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आणण्यात आले. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सदस्य आणि साताऱ्याचे पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चांगलीच ओढाताण झाली, त्यामुळे शुक्रवारचा दिवस साताऱ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक नाट्यमय घडामोडींचा ठरला. भारतीय जनता पार्टीने अनेक राजकीय पर्यायांचा वापर करत अध्यक्ष पदावर आपली मोहर उमटवली. आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला मात्र साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी भाजपला सहा मतांची गरज होती, दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एकत्रित राहणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचे पारडे जड होते, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष साताऱ्याकडे लागून राहिले होते. साताऱ्यात गुरुवारी 19 मार्च रोजी रात्रभर घडामोडी घडल्या, त्यात राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती, त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन, आम्ही स्वतः पक्ष सोबत गेल्याचे लेखी दिले आहे असे राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी निवड प्रक्रियेच्या दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व सदस्य लक्झरीतून जिल्हा परिषदेच्या सभागृहात येताना पोलीस बंदोबस्तामध्ये आणण्यात आले. या सर्व राजकीय परिस्थितीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे स्वतः जातीने लक्ष ठेवून होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कोणालाही सोडण्यात येत नव्हते, जि प सदस्य मान्यवर नेतेमंडळी यांना वगळता, पोलिसांनी कोणालाही आत येऊ दिले नाही, सदस्यांना आत आणताना सदस्य आणि शाहूपुरी पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि जोरदार धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीचे तीन सदस्य भाजपने फोडल्याची साताऱ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती, शह आणि काटशह याचे राजकारण शेवटच्या एक तासाच्या टप्प्यांमध्ये रंगले. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपने मोठा गेम खेळला, शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे राजू भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फुटल्याचे सांगितले जात होते, त्याला खासदार नितीन पाटील यांनी दुजोरा देताना आमच्या दोन सदस्यांना दोन दिवसापूर्वी उचलून नेण्यात आले असा आरोप केला होता, तसेच शिवसेनेचा एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे, त्यामुळे गेल्या 24 तासात भाजपने गेम फिरवत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या बाजूला फिरवण्यात यश मिळवले आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मतदान होऊन सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली आहे .अध्यक्ष प्रियाताई शिंदे व उपाध्यक्ष राजू भोसले यांची निवड झाल्याचे निश्चित झाले. तत्पूर्वी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणे बारा वाजता अर्जांची छाननी आणि दुपारी एक वाजता गरजेनुसार मतदान या प्रक्रिया जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आल्या .शेवटच्या टप्प्यामध्ये राजकीय ताण प्रचंड वाढला होता .या शेवटच्या राजकीय मतांच्या प्रक्रियेमध्ये भाजपने बाजी मारत आपले दोन्ही सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर बसवून जिल्हा परिषदेत राजकारण एक हाती फिरवल्याची चर्चा आहे.

No comments