साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भाजपची दांडगाई - पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांवर एफआयआर दाखल करणार
सातारा (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० मार्च २०२६ - सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात साम दाम दंड भेद सर्व प्रकारचे पर्याय वापरून भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष पदावर प्रियाताई शिंदे व उपाध्यक्ष पदावर बाबाराजे समर्थक राजू भोसले यांची वर्णी लावली .भारतीय जनता पार्टीने प्रशासनाला हाताशी धरून दांडगाईचे राजकारण केले आहे या घृणास्पद राजकारणाला साताऱ्याची जनता माफ करणार नाही असा घणाघात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
सातारा पोलिसांसह प्रशासनावर खाजगी एफ आय आर कोर्टात दाखल करून, न्यायंत्रणेकडे दाद मागणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. साताऱ्याचे पोलीस सत्ताधाऱ्यांचे मांडलिक असल्याप्रमाणे वागले, त्यामुळे येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले. साताऱ्यातील अध्यक्ष पदाच्या निवडी मध्ये नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या, या घडामोडीमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्तेसाठी सात्विक राजकारण सोडून सर्व पर्याय वापरले. प्रशासन यंत्रणा व पोलिसांना हाताशी धरून काही सदस्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, तर काही सदस्यांना अटक करण्यात आली. घडामोडींच्या पार्श्वभूमीनंतर 33 चे संख्या बळ गाठून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे या अध्यक्षपदावर निवडून आल्या तर उपाध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांची वर्णी लागली. या घडामोडी घटनाबाह्य पद्धतीने घडल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व घटनाक्रम कथन केला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विरोधी पक्षनेते आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, विराज शिंदे तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले राष्ट्रवादी व शिवसेना यांनी निवडणुकीपूर्वीच युती जाहीर करून तशी रणनीती स्पष्ट केली होती. जिल्हा परिषदेचे 33 संख्याबळ एकत्रितपणे घेऊन आम्ही आमच्या सदस्यांना मतदान प्रक्रियेसाठी सभागृहाकडे घेऊन जात होतो. त्यावेळी संपूर्ण इमारतीच्या कॉरिडॉर मध्ये 200 पोलीस साध्या वेशात तैनात होते. पोलिसांचा इतका बंदोबस्त माझ्या आकलनाच्या पलीकडचा होता. मी व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा साताऱ्याचे पोलीस आमच्याशी प्रचंड दांडगाईने वागले. जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे याला सभागृहाकडे घेऊन जात असताना, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लिफ्टच्या दारात रोखून त्याला एका बाजूला नेले. त्यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते व नगरसेवक फिरोज पठाण होते. निवड प्रक्रियेच्या वेळी सुद्धा कामेश कांबळे यांना मतदानासाठी जबरदस्तीने हात वर करायला लावण्यात आला. भारतीय जनता पार्टीने हे अत्यंत हीन पातळीचे राजकारण केले आहे. साताऱ्याच्या यशवंत विचारांच्या जिल्हा परिषदेत प्रगल्भ विचारांचे राजकारण चालते ते आज दिसून आले नाही. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की मध्ये माझ्या हाताला जखम झाल्यामुळे मला पट्टी लावावी लागली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची आम्ही मागणी करणार आहोत .तसेच जिल्हाधिकारी यांच्या समक्ष वरिष्ठ पातळीवरून दांडगाईचे राजकारण झाले त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनावर एफ आय आर कोर्टात दाखल करून न्यायंत्रणेकडे आम्ही दाद मागणार आहोत असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. याबाबतचा सर्व अहवाल आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्या कानावर घालणार आहोत. भारतीय जनता पार्टीने नीचपणाचा कळस करत लोकशाहीचा गळा घोटला आहे अशी कडवट टीका त्यांनी केली.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील म्हणाले सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी उंची आहे मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचे राजकारण हाताळले त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला कमीपणा आला आहे .राष्ट्रवादीचे सदस्य महाबळेश्वर येथे निवासस्थानी असताना त्यांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांच्या 10 गाड्या येथे आल्या होत्या .त्यांना हवे असणारे सदस्य ताब्यात घेण्यासाठी महिलांच्या रूमची झडती घेण्यात आली इतके गलिच्छ राजकारण भारतीय जनता पार्टीने केले आहे .आजची घटना म्हणजे पुरोगामी विचारांच्या सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस आहे .या जिल्ह्याने राज्याला नेतृत्व दिले देशाला नेतृत्व दिले .आज जिल्ह्यामध्ये असुरी पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला .भारतीय जनता पार्टीच्या या राजकारणामुळे सातारा जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकलेली नाही त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून व बळाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला .राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना अटक करून त्यांना जबरदस्तीने महाबळेश्वरला नेण्यात आले त्यांच्यावर तत्पूर्वी महाबळेश्वरच्या सदस्याच्या अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला .सदस्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन माझे कुणीही अपहरण केले नाही असे सांगूनही पोलिसांनी दात घेतली नाही दुसऱ्यांदा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला .संबंधित सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना महाबळेश्वरला नेण्यात आले जेणेकरून ते माघारी मतदानासाठी येऊ नये. म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल तर तो तुरुंगातून मतदान करू शकतो आणि जे सदस्य मतदानासाठी सभागृहात जाऊ इच्छितात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न होतात याचा अर्थ प्रशासन आणि भाजप यांच्या अर्थपूर्ण राजकारण दडलेले आहे असा आरोप शशिकांत शिंदे यांनी करत यासंदर्भात रस्त्यावर उतरून शेवटपर्यंत न्यायालयीन संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला.

No comments